IND vs AUS : टीम इंडियाचे वर्चस्व कायम; ऑस्ट्रेलियाला केवळ दोन धावांची आघाडी 

IND vs AUS : टीम इंडियाचे वर्चस्व कायम; ऑस्ट्रेलियाला केवळ दोन धावांची आघाडी 

रविंद्र जाडेजा

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होत असलेल्या बॉक्सिंग-डे कसोटीत भारतीय संघाने तिसऱ्या दिवशीही ऑस्ट्रेलियावर वर्चस्व कायम राखले. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला भारताने मोठी आघाडी घेतली आणि गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाची दिवसअखेर दुसऱ्या डावात ६ बाद १३३ अशी अवस्था केली. ऑस्ट्रेलियाकडे केवळ दोन धावांची आघाडी होती. पहिल्या कसोटीत ३६ धावांच्या नीचांकाची नोंद करणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत मात्र फलंदाजीत सुधारणा केली. भारताने पहिल्या डावात ३२६ धावा केल्याने त्यांना १३१ धावांची आघाडी मिळाली होती.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांत आटोपला होता. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची अडखळती सुरुवात झाली. उमेश यादवने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर जो बर्न्सला चौथ्या षटकातच माघारी पाठवले. मॅथ्यू वेड आणि मार्नस लबूशेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, रविचंद्रन अश्विनने लबूशेनला (२८) माघारी पाठवत ही जोडी फोडली. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टिव्ह स्मिथही फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्याचा ८ धावांवर जसप्रीत बुमराहने त्रिफळा उडवला.

एका बाजूने विकेट जात असताना वेडने सावध फलंदाजी सुरु ठेवली. त्याने १३७ चेंडू खेळून काढत ४० धावा केल्या. मात्र, त्याला रविंद्र जाडेजाने बाद करत ऑस्ट्रेलियाला आणखी एक झटका दिला. जाडेजानेच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनला केवळ एका धावेवर बाद केले. त्यामुळे तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची ६ बाद १३३ अशी धावसंख्या होती आणि त्यांच्याकडे केवळ दोन धावांची आघाडी होती.

रविंद्र जाडेजाचे अर्धशतक

तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला भारताने पहिल्या डावात त्रिशतकी मजल मारली. दुसऱ्या दिवसअखेर भारताची ५ बाद २७७ अशी धावसंख्या होती. तिसऱ्या दिवशी पुढे खेळताना भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे ११२ धावांवर धावचीत झाला. मात्र, डावखुऱ्या रविंद्र जाडेजाने चांगली फलंदाजी सुरु ठेवत १३२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अखेर ५७ धावांवर त्याला मिचेल स्टार्कने बाद केले. यानंतर अश्विन (१४) वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. त्यामुळे भारताचा पहिला डाव ३२६ धावांवर संपुष्टात आला.

संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया : १९५ आणि ६ बाद १३३ (वेड ४०, लबूशेन २८; जाडेजा २/२५) वि. भारत : पहिला डाव ३२६ (रहाणे ११२, जाडेजा ५७; लायन ३/७२). 

First Published on: December 28, 2020 10:09 PM
Exit mobile version