इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा

इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा

श्रीकांतला जेतेपदाची हुलकावणी !

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतला जवळपास दीड वर्षांनंतर एखाद्या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यात यश आले होते. मात्र, इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याला पराभवाला सामोरे जावे लागले. डेन्मार्कच्या व्हिक्टर अ‍ॅक्सेलसनने त्याचा २१-७, २२-२० असा पराभव केला. श्रीकांतने दुसर्‍या गेममध्ये चांगली झुंज दिली. या गेममध्ये त्याच्याकडे २०-१८ अशी आघाडी होती. मात्र, यानंतर त्याचा खेळ खालावल्याने अ‍ॅक्सेलसनने हा गेम आणि सामनाही जिंकला. यावर्षीच्या सुरुवातीला झालेल्या ऑल-इंग्लंड स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकले होते, तर २०१७ मध्ये त्याने पहिल्यांदा इंडिया ओपन स्पर्धा जिंकली होती. श्रीकांतला २०१५ मध्ये ही स्पर्धा जिंकण्यात यश आले होते, मात्र यंदा त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

अंतिम सामन्याचा पहिला गेम अवघ्या १२ मिनिटांत संपला. सुरुवातीला दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ केल्यामुळे ५-५ अशी बरोबरी होती. मात्र, अ‍ॅक्सेलसनने यापुढे चांगला खेळ करत मध्यांतराला ११-७ अशी आघाडी मिळवली. मध्यांतरानंतर अव्वल सीडेड अ‍ॅक्सेलसनने अधिकच आक्रमक खेळ केला. त्याने सलग १० गुण मिळवत हा गेम २१-७ असा मोठ्या फरकाने जिंकला. दुसर्‍या गेमची सुरुवातही अ‍ॅक्सेलसनने आक्रमक खेळ करत केली. त्याने सुरुवातीलाच ५-१ अशी मोठी आघाडी घेतली.

मात्र, श्रीकांतने जरा जिद्द दाखवत सरळ ३ गुण मिळवले, तर मध्यांतराला श्रीकांत ९-११ असा अवघ्या २ गुणांनी पिछाडीवर होता. पुढेही हा गेम रंगतदार झाला. दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ केल्यामुळे या गेममध्ये १५-१५ अशी बरोबरी होती. पुढे श्रीकांतने आक्रमण करत २०-१८ अशी आघाडी मिळवली आणि पुढील गुण मिळवत त्याला हा सेट जिंकण्याची संधी होती. मात्र, अ‍ॅक्सेलसनने योग्य वेळी आपला खेळ उंचावत २०-२० अशी बरोबरी केली, तर पुढील २ गुणही मिळवत हा गेम २२-२० असा जिंकत ही स्पर्धाही जिंकली.

महिलांमध्ये इंटनॉन विजयी

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात थायलंडच्या रात्चनॉक इंटनॉनने चीनच्या अव्वल सीडेड ही बिन्गजियोचा पराभव केला. तिने हा सामना २१-१५, २१-१४ असा सरळ गेममध्ये जिंकला. पुरुष दुहेरीचे इंडोनेशियाच्या ली यांग आणि वॉन्ग ची-लिन या जोडीने, तर महिला दुहेरीचे ग्रेसीया पोली आणि अप्रियानी राहायु या जोडीने जेतेपद पटकावले.

First Published on: April 1, 2019 4:15 AM
Exit mobile version