IND vs ENG : भारतीय संघाने सध्या केवळ डे-नाईट कसोटीचा विचार करावा – गंभीर  

IND vs ENG : भारतीय संघाने सध्या केवळ डे-नाईट कसोटीचा विचार करावा – गंभीर  

भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद (World Test Championship) स्पर्धेचा फार विचार करू नये. त्यांनी आता केवळ इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत असून या मालिकेतील तिसरा सामना प्रकाशझोतात (डे-नाईट) अहमदाबाद येथे होणार आहे. भारताला जागतिक स्पर्धेची अंतिम फेरी गाठायची असल्यास त्यांनी ही मालिका किमान २-१ अशी जिंकणे अनिवार्य आहे. ‘प्रत्येक कसोटी सामना खूप महत्वाचा असतो. त्यामुळे भारताने जागतिक कसोटी स्पर्धेचा फार विचार करू नये. त्यांनी आता केवळ डे-नाईट कसोटीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. माझ्या मते, हा सामना चुरशीचा होईल,’ असे गंभीरने सांगितले.

गंभीरशी रोहित सहमत

गंभीरच्या या मताशी भारताचा सलामीवीर रोहित शर्मा सहमत होता. आम्हाला जागतिक कसोटी स्पर्धेची अंतिम फेरी गाठायची आहे, पण आता आमचे लक्ष केवळ तिसऱ्या कसोटी सामन्यावर असल्याचे रोहित म्हणाला. अगदी खरे सांगायचे तर आम्ही सामना खेळत असताना बाहेरचे लोक काय म्हणत आहेत, त्याकडे अजिबातच लक्ष देत नाही. आम्हाला नक्कीच जागतिक कसोटी स्पर्धेची अंतिम फेरी गाठायची आहे. परंतु, त्यासाठी आम्हाला आधी बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत. आम्हाला आधी दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यामुळे आता आमचे केवळ या कसोटी सामन्यांवर लक्ष आहे, असे रोहित म्हणाला.

First Published on: February 22, 2021 11:02 PM
Exit mobile version