कोहलीच्या नावे क्रिकेटमधला अजून एक रेकॉर्ड

कोहलीच्या नावे क्रिकेटमधला अजून एक रेकॉर्ड

विराट कोहली

भारताचा कर्णधार विराट कोहली आपल्या अप्रतिम बॅटिंगमुळे सर्वत्र चर्चेत असून इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने एकट्याने भारताचा डाव सावरायचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला चांगली साथ मिळाली नसल्याने भारताला विजय मिळवता आला नाही. तरीही विराटने मात्र आयसीसी कसोटी क्रमवारीत बाजी मारत अव्वल स्थान पटकावले आहे. यासोबतच विराटचा जागतिक क्रिकेटमधील महान फलंदाजांच्या यादीत समावेश झाला असून याबाबतचे टि्वट आयसीसीने आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून केले आहे.

म्हणून झाला विराटचा गौरव

इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यात भारताला ३१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र विराटने पहिल्या डावात केलेल्या १४९ आणि दुसऱ्या डावातील ५१ अशा एकूण २०० धावांच्या जोरावर आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. यासोबतच तो सध्या आयसीसी एकदिवसीय क्रिकेटमध्येही पहिल्या स्थानी आहे. एकाचवेळी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात अव्वल स्थान पटकावणारा तो जगातील नववा फलंदाज ठरला असून भारताचा दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी ही कामगिरी भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने केली होती. तर क्रिकेट जगतात सर विव्ह रीचर्ड्स, ब्रायन लारा, जावेद मियाँदाद, केथ स्टॅकपोल, जॅक कॅलिस, रिकी पॉन्टिंग आणि हशिम अमला यांनी ही कामगिरी केली आहे.


भारताचा दुसरा कसोटी सामना ९ ऑगस्टपासून लॉर्ड्सवर खेळवला जाणार असून पराभवानंतर कमबॅक करण्यासाठी भारत उत्सुक असेल. लॉर्ड्सला क्रिकेटची पंढरी मानली जात असून यावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना चुरशीचा होईल हे नक्की!

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संभाव्य संघ

भारत – विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), करुण नायर, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, उमेश यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, चेतेश्वर पुजारा, शार्दूल ठाकूर.

इंग्लंड – जो रूट (कर्णधार), अॅलिस्टर कूक, किटन जेनिंग्स, जॉनी बेरस्टोव, जोस बटलर, आदिल रशीद, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, सॅम करन, मोईन अली, जेमी पोर्टर, क्रिस वोक्स, ऑली पोप.

First Published on: August 7, 2018 1:57 PM
Exit mobile version