IND vs AUS : टीम इंडियाचे लक्ष्य विजयी सलामीचे; पहिली वनडे आज

IND vs AUS : टीम इंडियाचे लक्ष्य विजयी सलामीचे; पहिली वनडे आज

कोहली आणि फिंच

भारतीय क्रिकेट चाहते आपल्या संघाला पुन्हा एकदा मैदानात पाहण्यास आतुर झाले आहेत. भारतीय संघाने अखेरचा सामना मार्चमध्ये खेळला. त्यानंतर कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट थांबले आणि काही महिन्यांनंतर पुन्हा सुरुसुध्दा झाले. मात्र, भारताच्या खेळाडूंना निळ्या जर्सीत पुन्हा पाहण्यासाठी चाहत्यांना बरीच वाट पाहावी लागली. अखेर भारतीय संघ आठ महिन्यांनी पुन्हा मैदानात दिसणार आहे. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला शुक्रवारपासून (आज) सुरुवात होत असून पहिला एकदिवसीय सामना सिडनी येथे होईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया या तुल्यबळ संघांमध्ये सुरुवातीला तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. या मालिकेत भारताचा संघ नव्या गडद निळ्या जर्सीत खेळताना दिसणार आहे. भारतीय संघाने १९९२ विश्वचषकात परिधान केलेल्या गडद निळ्या जर्सीकडून प्रेरणा घेऊन ही जर्सी बनवण्यात आली आहे. मात्र, भारताचा सलामीवीर रोहित शर्मा या जर्सीत दिसणार नाही. रोहित दुखापतीमुळे एकदिवसीय, तसेच टी-२० मालिकेला मुकणार आहे.

त्याच्या जागी मयांक अगरवालला शिखर धवनच्या साथीने सलामीची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. मयांकने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत ११ सामन्यांत ४२४ धावा फटकावल्या होत्या, ज्यात एका शतकाचा समावेश होता. भारताच्या फलंदाजीची धुरा कर्णधार विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल सांभाळतील. मात्र, ऑस्ट्रेलियाकडे मिचेल स्टार्क, जॉश हेझलवूड आणि पॅट कमिन्ससारखे गोलंदाज असल्याने भारतीय फलंदाजांना धावांसाठी झुंजावे लागेल.

भारताच्या गोलंदाजीची जबाबदारी प्रामुख्याने जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि युजवेंद्र चहल यांच्या खांद्यावर असेल. बुमराह आणि शमी एकदिवसीय, टी-२०, कसोटी या तिन्ही संघांचा भाग आहेत. त्यामुळे या दोघांनाही काही सामन्यांत विश्रांती मिळू शकेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघ कर्णधार अॅरॉन फिंच, डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ या त्रिकुटावर अवलंबून असणार आहे. या तिघांना लवकर बाद करत ऑस्ट्रेलियाच्या इतर फलंदाजांवर दबाव टाकण्याचा भारतीय गोलंदाज नक्कीच प्रयत्न करतील.


प्रतिस्पर्धी संघ (संभाव्य ११)

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अगरवाल, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी.

ऑस्ट्रेलिया : अॅरॉन फिंच (कर्णधार), डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लबूशेन, मार्कस स्टोईनिस, ग्लेन मॅक्सवेल, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जॉश हेझलवूड, अॅडम झॅम्पा.


 

First Published on: November 27, 2020 12:10 AM
Exit mobile version