IND vs ENG : लॉर्ड्स कसोटीत भारत-इंग्लंडच्या खेळाडूंमधील वाद मैदानाबाहेरही सुरु राहिला!

IND vs ENG : लॉर्ड्स कसोटीत भारत-इंग्लंडच्या खेळाडूंमधील वाद मैदानाबाहेरही सुरु राहिला!

भारत-इंग्लंडच्या खेळाडूंमधील वाद लॉर्ड्सच्या 'लॉंग रूम'मध्येही सुरु राहिला

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला बुधवारपासून सुरुवात झाली. परंतु, या दोन संघांमधील दुसऱ्या कसोटीबाबतची चर्चा अजूनही सुरु आहे. लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने १५१ धावांनी विजय मिळवला होता. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यादरम्यान भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. तिसऱ्या दिवशी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने फलंदाजी करणाऱ्या जेम्स अँडरसनला बरेच उसळी घेणारे चेंडू टाकले. ही बाब न आवडल्याने अँडरसनने बुमराहसोबत हुज्जत घातली. परंतु, दोन्ही संघांमधील हा वाद केवळ मैदानापुरता मर्यादित राहिला नाही.

रूट-कोहलीमध्येही वाद

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर पॅव्हेलियनमध्ये परत जात असताना दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु, हा वाद लॉर्ड्सच्या लॉंग रूममध्येही सुरु राहिला. भव्य अशा या जागी भारताचे प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ सदस्य आणि राखीव खेळाडू उपस्थित होते. त्यांनी टाळ्या वाजवत भारतीय खेळाडूंचे स्वागत केले. इंग्लंडचा कर्णधार जो रूटही नाबाद १८० धावांची उत्कृष्ट खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परत येत होता. त्याच्यात आणि भारताचा कर्णधार विराट कोहलीमध्ये वाद झाल्याचे समजले. परंतु, खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये गेल्यानंतर हा वाद शमला, अशी माहिती इंग्लंडमधील वृत्तपत्र ‘डेली टेलिग्राफ’ने दिली.

केवळ दोन संघांचे सदस्य उपस्थित

लॉर्ड्सच्या लॉंग रूममध्ये एमसीसीचे सदस्य उपस्थिती असतात आणि दोन्ही संघांचे खेळाडू विविध दिशांनी ड्रेसिंग रूममध्ये जातात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध घालण्यात आले होते. एमसीसी सदस्यांच्या लॉंग रूममधील प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे या जागी केवळ दोन संघांचे सदस्य उपस्थित होते आणि वाद वाढण्याची शक्यता बळावली होती. परंतु, सुदैवाने तसे काही झाले नाही, अशीही माहितीही इंग्लंडमधील वृत्तपत्राने दिली आहे.


हेही वाचा – भारतीय संघाचे पारडे जड; माजी क्रिकेटपटूच्या मते इंग्लंड ‘बॅकफूटवर’


 

First Published on: August 25, 2021 6:30 PM
Exit mobile version