IND vs ENG 3rd Test : कोहलीने प्रथम फलंदाजी घेऊन धोका पत्करला; माजी क्रिकेटपटूची टीका

IND vs ENG 3rd Test : कोहलीने प्रथम फलंदाजी घेऊन धोका पत्करला; माजी क्रिकेटपटूची टीका

हेडिंग्ले येथे होत असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीचा फटका भारताला बसला. भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांत आटोपला. भारताच्या केवळ रोहित शर्मा (१९) आणि अजिंक्य रहाणे (१८) या दोनच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. भारतीय फलंदाजीचे आधारस्तंभ मानले जाणारे चेतेश्वर पुजारा (१) आणि कर्णधार विराट कोहली (७) यांना जेम्स अँडरसनने झटपट माघारी पाठवले. त्यामुळे मधल्या फळीच्या कामगिरीवर भारताचे माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी टीका केली. तसेच भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊन धोका पत्करल्याचेही ते म्हणाले.

इंग्लंडवर दडपण टाकण्याची संधी होती

लीड्स येथील वातावरण सुरुवातीला फलंदाजांसाठी प्रतिकूल असते. हेडिंग्ले मैदानाचा इतिहास पाहिल्यास सकाळच्या सत्रात विकेट पडण्याची शक्यता असते. त्यामुळे कोहलीने प्रथम फलंदाजी स्वीकारून धोका पत्करला. मागील कसोटीत इंग्लंडला फारशा धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर अधिक दडपण टाकण्याची भारताला संधी होती. तसेच भारताने आता हा सामना गमावल्यास त्यांना नाणेफेकीचे कारण देता येणार नाही. तुम्ही चांगली फलंदाजी केली नाहीत, असे मदन लाल यांनी सांगितले.

अधिक जबाबदारीने खेळण्याची गरज 

भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांना फारशा धावा करता आलेल्या नाहीत. भारताचा प्रमुख फलंदाज, कोहलीकडून धावा होत नाहीत. आपल्या सर्वांनाच त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहेत. परंतु, तो चांगली कामगिरी करत नसल्याने इतर फलंदाजही धावा करण्यासाठी प्रेरित होत नाहीत. त्यामुळे त्याच्यासह भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी अधिक जबाबदारीने खेळत कामगिरीत सुधारणा करण्याची गरज आहे, असे मदन लाल यांनी स्पष्ट केले. तसेच सामन्याच्या सुरुवातीला चेंडू स्विंग होत असल्याने नाणेफेक जिंकून कर्णधार फलंदाजीचा निर्णय घेतात. त्यामुळे कोहलीने फलंदाजी स्वीकारत बहुधा चूक केल्याचेही मदन लाल म्हणाले.


हेही वाचा – इंग्लिश चाहत्यांची पुन्हा बेशिस्त वागणूक; सिराजला फेकून मारला बॉल


 

First Published on: August 26, 2021 8:31 PM
Exit mobile version