घरक्रीडाIND vs ENG 3rd Test : इंग्लिश चाहत्यांची पुन्हा बेशिस्त वागणूक; सिराजला...

IND vs ENG 3rd Test : इंग्लिश चाहत्यांची पुन्हा बेशिस्त वागणूक; सिराजला फेकून मारला बॉल

Subscribe

भारताचा कर्णधार विराट कोहलीने रागात सीमारेषेवर उभ्या सिराजला एक वस्तू बाहेर फेकण्यास सांगितल्याचे टीव्ही कॅमेरामध्ये दिसले होते.

इंग्लंडच्या चाहत्यांनी आपली बेशिस्त वागणूक लॉर्ड्स कसोटी पाठोपाठ हेडिंग्ले कसोटीतही सुरु ठेवली आहे. इंग्लिश चाहत्यांनी लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या लोकेश राहुलवर शॅम्पेनच्या बाटल्यांचे लाकडी बूच फेकून मारले होते. तर बुधवारपासून सुरु झालेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लिश चाहत्यांनी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला चेंडू फेकून मारला. भारताचा कर्णधार विराट कोहलीने रागात सीमारेषेवर उभ्या सिराजला एक वस्तू बाहेर फेकण्यास सांगितल्याचे टीव्ही कॅमेरामध्ये दिसले होते. परंतु, कोहलीला कशाचा राग आला हे स्पष्ट झाले नव्हते. परंतु, पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतने चाहत्यांनी सिराजला चेंडू फेकून मारल्याने कोहली रागावल्याची माहिती दिली.

वस्तू फेकून मारणे चुकीचे

प्रेक्षकांपैकी कोणीतरी सिराजला चेंडू फेकून मारला. त्यामुळे कोहलीला राग आला होता. प्रेक्षक म्हणून तुम्ही खेळाडूंना काहीही बोलू शकता, त्यांच्याबाबत घोषणा करू शकता, पण तुम्ही खेळाडूला एखादी वस्तू फेकून मारणे चुकीचे आहे. क्रिकेटसाठी ही गोष्ट योग्य नाही, असे पंतने स्पष्ट केले. याआधी लॉर्ड्स कसोटीत सीमारेषेवर उभ्या राहुलवर इंग्लिश चाहत्यांनी शॅम्पेनच्या बाटल्यांचे लाकडी बूच फेकून मारले होते. त्यावेळीही कोहलीला राग आला होता आणि त्याने राहुलला बूच पुन्हा प्रेक्षकांच्या दिशेने फेकण्याची खूणही केली होती.

प्रतिस्पर्धी संघाच्या चाहत्यांनी केले लक्ष्य

सिराजला प्रतिस्पर्धी संघाच्या चाहत्यांनी लक्ष्य केल्याची ही पहिली वेळ नाही. याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात काही चाहत्यांनी सिराजवर वर्णभेदी टीका केली होती. सिडनी येथे झालेल्या कसोटीत काही चाहत्यांनी सिराजवर वर्णभेदी टीका केली आणि काही घोषणाही दिल्या. याबाबतची तक्रार सिराजने पंचांकडे केल्याने काही काळ खेळ थांबवण्यात आला होता. आता हेडिंग्ले कसोटीत इंग्लिश चाहत्यांनी सिराजला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने हाताने खूण करत भारतीय संघ मालिकेत १-० असा आघाडीवर असल्याचे दाखवले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -