भारत विरुद्व इंग्लंड एकदिवसीय मालिकेची उद्यापासून सुरूवात

भारत विरुद्व इंग्लंड एकदिवसीय मालिकेची उद्यापासून सुरूवात

इंग्लंडविरूद्ध भारत

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना उद्या रंगणार आहे. एकदिवसीय क्रमवारीत इंग्लंड पहिल्या तर भारत दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे या मालिकेवर सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

इंग्लंडने मागील २-३ वर्षात अप्रतिम कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मागील मालिकेतही त्यांनी दमदार प्रदर्शन करत मालिका ५-० अशी जिंकली होती. इतकेच काय तर त्या मालिकेत नॉटिंगहॅम येथे झालेल्या सामन्यातच ४८१ धावा करून त्यांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक धावसंख्या उभारली. तसेच नॉटिंगहॅमच्या छोट्या मैदानात इंग्लंडने २ वेळा ४०० धावांचा टप्पा पार केला आहे. या मैदानातील परिस्तिथी ही फलंदाजांसाठी अनुकूल आहे. इंग्लंडकडे बेरस्टोव, रॉय, हेल्स, मॉर्गन, बटलर, स्टोक्स यांसारखे आक्रमक फलंदाज आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यातही इंग्लंडकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे.

तर भारतानेही टी-२० मालिका जिंकत आपण या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे. भारताकडे इंग्लंडला टक्कर देणारे धवन, रोहित, कोहली, ढोणी, राहुल यांसारखे फलंदाज आहेत. मात्र, बुमराह या मालिकेत खेळू शकणार नाही त्यामुळे भारताच्या इतर गोलंदाजांना आपला खेळ उंचवायची आवश्यकता आहे. तसेच भारतीय संघात ६ वा फलंदाज कोण खेळणार यासाठी दिनेश कार्तिक, श्रेयस अय्यर आणि सुरेश रैना यान्चायत लढाई आहे. त्यामुळे ज्याकोणाला या सामन्यात संधी मिळेल तो त्या संधीचे सोनं करण्याचा प्रयत्न करेल.
इंग्लंडने मागील ३ वर्षात घरच्या परिस्तिथीत खेळताना ३६ सामन्यांत २८ सामने जिंकले आहेत. तर गेल्या १० एकदिवसीय सामन्यांत ते अपराजित आहेत. भारतीय संघानेही आपण चांगल्या फॉर्मात असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे ही मालिका क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.

First Published on: July 11, 2018 6:23 PM
Exit mobile version