IND vs ENG : सूर्याला संधी देण्याची हीच वेळ; माजी कर्णधाराच्या मते भारताला अतिरिक्त फलंदाजाची गरज

IND vs ENG : सूर्याला संधी देण्याची हीच वेळ; माजी कर्णधाराच्या मते भारताला अतिरिक्त फलंदाजाची गरज

सूर्यकुमार यादवला मिळणार संधी?

भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांना मागील काही काळात मोठी खेळी करण्यात अपयश येत आहे. इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराने ९१ धावांची खेळी केली. त्याला पुन्हा एकदा शतकाने हुलकावणी दिली. त्यातच कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनाही सातत्याने धावा करता आलेल्या नाहीत. त्यामुळे भारताने इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीसाठी अतिरिक्त फलंदाजाची संघात निवड करण्याची गरज असून मुंबईकर सूर्यकुमार यादवला संधी देण्याची हीच वेळ असल्याचे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना २ सप्टेंबरपासून ओव्हल येथे खेळला जाणार आहे.

सहा फलंदाजांसह खेळले पाहिजे

भारतीय संघाने फलंदाजांची फळी अधिक मजबूत करण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांनी हनुमा विहारीच्या आधी सूर्यकुमार यादवला संधी दिली पाहिजे. भारताने एका गोलंदाजाला वगळून सहा प्रमुख फलंदाजांसह खेळले पाहिजे, असे वेंगसरकर म्हणाले. सूर्यकुमारने मागील काही वर्षांत एकदिवसीय आणि विशेषतः टी-२० क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबईकडून ४४ हूनही अधिकच्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्यामुळे तो कसोटी क्रिकेटमध्येही यशस्वी ठरू शकेल असा वेंगसरकारांना विश्वास आहे.

गुणवत्तेबाबत जराही शंका नाही

सूर्याच्या गुणवत्तेबाबत मला जराही शंका नाही. तो या भारतीय संघातील सर्वोत्तम फलंदाजांइतकीच चांगली कामगिरी करू शकेल. तो आता मागील काही काळापासून भारतीय संघासोबत आहे. त्यामुळे त्याला संधी देण्याची हीच वेळ आहे, असे वेंगसरकर म्हणाले. तसेच पहिल्या तिन्ही सामन्यांत अश्विनला का संधी दिली गेली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तुम्ही सर्वोत्तम फिरकीपटूला संघाबाहेर ठेवता याचे समर्थन करणे अवघड असल्याचे वेंगसरकर यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा – एका पराभवानंतर कठोर निर्णयांची गरज नाही; कोहलीकडून ‘या’ खेळाडूची पाठराखण


 

First Published on: August 28, 2021 10:57 PM
Exit mobile version