IND vs ENG : लोक माझ्याविषयी बोलतात म्हणजे मी महत्त्वाचा; रहाणेचे टीकाकारांना प्रत्युत्तर

IND vs ENG : लोक माझ्याविषयी बोलतात म्हणजे मी महत्त्वाचा; रहाणेचे टीकाकारांना प्रत्युत्तर

Ajinkya Rahane : चांगली कामगिरी करुनही ODI मधून वगळले, अजिंक्य रहाणेकडून नाराजी व्यक्त

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला मागील काही काळात सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याच्यावर टीका केली आहे. परंतु, या गोष्टीची फार चिंता नसल्याचे रहाणे म्हणाला. भारताने लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर झालेला दुसरा कसोटी सामना जिंकत पाच सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. या कसोटीच्या दुसऱ्या डावात रहाणेने चिकाटीने फलंदाजी करत ६१ धावांची खेळी केली. तसेच त्याने चेतेश्वर पुजारासोबत शतकी भागीदारीही रचली. पुजारालाही मागील काही कसोटी सामन्यांत चांगली कामगिरी करता आलेली नाही. मात्र, आमच्यासाठी संघाच्या यशात योगदान देणे सर्वात महत्त्वाचे असल्याचे रहाणेने स्पष्ट केले.

दडपण कसे हाताळायचे हे ठाऊक

लोक माझ्याबद्दल बोलत असल्याचा आनंद आहे. लोक केवळ महत्त्वाच्या व्यक्तींबद्दलच चर्चा करतात. परंतु, लोकांच्या टीकेची मला चिंता नाही. संघासाठी योगदान देणे सर्वात महत्त्वाचे असल्याचे मला वाटते. मी आणि पुजारा बराच काळ क्रिकेट खेळत आहोत. त्यामुळे दडपण कसे हाताळायचे, अवघड परिस्थितीत चांगली कामगिरी कशी करायची, हे आम्हाला ठाऊक आहे. आमच्यासाठी स्वतःच्या कामगिरीपेक्षा संघाचे यश जास्त महत्त्वाचे आहे. लोक आमच्याबाबत काय बोलतात हे आम्ही ठरवू शकत नाही. केवळ संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न असतो, असे रहाणे म्हणाला.

पुजाराची कामगिरी महत्त्वाची

लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात रहाणे आणि पुजाराने १०० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. मी नेहमीच संघाचा विचार करतो. त्यामुळे ६१ धावांच्या खेळीचे मला समाधान होते. आम्हाला केवळ खेळपट्टीवर वेळ घालवायचा होता. पुजारा संथ फलंदाजी करत असल्याने त्याच्यावर नेहमी टीका होते. परंतु, त्याने २०० चेंडू खेळून काढले आणि हे खूप महत्त्वाचे ठरले, असेही रहाणेने सांगितले.


हेही वाचा – विराट शतकाचा दुष्काळ लवकरच संपवेल; प्रशिक्षकांना विश्वास


 

First Published on: August 23, 2021 8:23 PM
Exit mobile version