IND vs ENG : भारत-इंग्लंड वनडे सामने पुण्यातच; प्रेक्षकांविना सामने घेण्यास परवानगी

IND vs ENG : भारत-इंग्लंड वनडे सामने पुण्यातच; प्रेक्षकांविना सामने घेण्यास परवानगी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ४ मार्चपासून खेळला जाणार आहे. या सामन्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका, तसेच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडणार आहे. एकदिवसीय मालिकेचे तिन्ही सामने पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळले जाणार असून हे सामने रिकाम्या स्टेडियममध्ये म्हणजेच प्रेक्षकांविना घेण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. या एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना २३ मार्च, दुसरा सामना २६ मार्च, तर तिसरा सामना २८ मार्चला खेळला जाणार आहे.

महाराष्ट्रात सामने होण्याबाबत साशंकता होती

मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचे सामने महाराष्ट्रात होण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती. बीसीसीआय हे सामने महाराष्ट्राबाहेर घेण्याचा विचार करत असल्याचीही चर्चा होती. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विकास काकटकर आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी शनिवारी उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.

मिलिंद नार्वेकर, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, विकास काकटकर

सामने प्रेक्षकांविना घेण्यासाठी परवानगी

सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, उद्धव ठाकरे यांनी भारत-इंग्लंड एकदिवसीय सामने रिकाम्या स्टेडियममध्ये म्हणजेच प्रेक्षकांविना घेण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच हे एकदिवसीय सामने घेताना खेळाडू, सपोर्ट स्टाफचे सदस्य आणि पंच यांची योग्य ती काळजी घेण्याची विनंतीही उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला केली आहे.

First Published on: February 27, 2021 6:37 PM
Exit mobile version