IND vs ENG : भारताचा ‘हा’ गोलंदाज कोणत्याही फलंदाजाला बाद करू शकतो; कर्णधार कोहलीकडून कौतुक

IND vs ENG : भारताचा ‘हा’ गोलंदाज कोणत्याही फलंदाजाला बाद करू शकतो; कर्णधार कोहलीकडून कौतुक

मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह

वेगवान गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला १५१ धावांनी पराभूत केले होते. या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघ पिछाडीवर होता. परंतु, दुसऱ्या डावात भारतीय संघाने उत्कृष्ट खेळ करत सामना जिंकला. भारताच्या या विजयात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने महत्त्वाची भूमिका बजावली होती. सिराजने दोन्ही डावांत चार-चार विकेट घेतल्या. सामना अनिर्णित राहणार असे वाटत असतानाच त्याने एकाच षटकात जॉस बटलर आणि जेम्स अँडरसन यांना बाद करत भारताला विजय मिळवून दिला होता. सिराजने मागील वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून चांगली कामगिरी केली आहे. त्याने मागील काही काळात केलेल्या प्रगतीचे भारताचा कर्णधार विराट कोहलीला अजिबातच आश्चर्य वाटले नाही.

खेळाचा स्तर उंचावला

मी सिराजला खूप जवळून पाहिले आहे. त्यामुळे त्याने ज्याप्रकारे प्रगती केली आहे, त्याचे मला अजिबातच आश्चर्य वाटले नाही. चांगला गोलंदाज होण्यासाठी आवश्यक गुणवत्ता त्याच्याकडे सुरुवातीपासूनच होती. परंतु, तुम्हाला आत्मविश्वास गरजेचा असतो आणि ऑस्ट्रेलियात केलेल्या कामगिरीमुळे त्याचा आत्मविश्वास वाढला. आपण कोणत्याही फलंदाजाला बाद करू शकतो हा विश्वास त्याला आला. या विश्वासामुळेच त्याच्या खेळाचा स्तर उंचावला आहे, असे कोहली म्हणाला. मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सिराजने आतापर्यंत ७ सामन्यांत २७ विकेट घेतल्या आहेत.

रोहित, राहुलचेही कौतुक

तसेच कोहलीने रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या सलामीवीरांचेही कौतुक केले. परदेशात खेळताना सलामीवीरांनी चांगली कामगिरी करणे खूप महत्त्वाचे असते. राहुल आणि रोहित यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पुढेही ते अशीच कामगिरी सुरु ठेवतील अशी मला आशा आहे. दोन्ही कसोटीत त्यांनी चांगली सुरुवात करून दिल्याने इतर फलंदाजांचे काम सोपे झाल्याचे कोहलीने नमूद केले. या मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत राहुल (२४४ धावा) अव्वल, तर रोहित (१५२ धावा) दुसऱ्या स्थानावर आहे.


हेही वाचा – लॉर्ड्स कसोटीत त्याचा मला बाद करण्याचा प्रयत्न नव्हता; अँडरसनची बुमराहवर टीका


 

First Published on: August 24, 2021 9:24 PM
Exit mobile version