IND vs NZ 2nd Test : पहिल्या दिवसाअखेर भारत मजबूत स्थितीत; मयंक अग्रवालची शानदार शतकीय खेळी

IND vs NZ 2nd Test : पहिल्या दिवसाअखेर भारत मजबूत स्थितीत; मयंक अग्रवालची शानदार शतकीय खेळी

भारत विरूद्ध न्यूझीलंड मुंबई कसोटी सामन्याला गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे उशिराने सुरूवात झाली. सध्या दोन्ही संघामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. दोन सामन्यांच्या मालिकेचा हा शेवटचा आणि निर्णायक सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडत आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान पहिल्या दिवसाअखेर भारताची धावसंख्या ७० षटकांत ४ बाद २२१ एवढी झाली आहे. न्यूझीलंडकडून एकट्या एजाज पटेलने ४ बळी घेतले. पहिल्या दिवसाअखेर भारताकडून मयंक अग्रवालने नाबाद २४६ चेंडूत १२० धावांची शतकीय खेळी केली. तर ऋध्दिमान साहाने देखील नाबाद २५ धावा करून भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहचवण्यात हातभार लावला.

पहिल्या दिवसाअखेर न्यूझीलंडकडून फिरकीपटू एजाज पटेल एकमात्र यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने शुभमन गिल (४४), चेतेश्वर पुजारा (०), विराट कोहली (०), आणि मागील सामन्यातील शतकवीर श्रेयस अय्यरला (१८) धावांवर बाद केले. लक्षणीय बाब म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा हे दोघेही खाते न उघडताच माघारी परतले. दरम्यान मयंक अग्रवालच्या शतकीय खेळीच्या जोरावर भारतीय संघाने २०० चा आकडा पार केला आहे.

भारतीय संघाने डावाची सुरूवात पहिल्यापासून शानदार केली. भारतीय संघाला पहिला झटका संघाची धावसंख्या ८० असताना शुभमन गिलच्या रूपात बसला. गिलने ४४ धावांची साजेशी खेळी करून संघाला चांगली सुरूवात करून दिली. तर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही. अय्यर चांगल्या लयनुसार खेळत होता मात्र डावाच्या ४८ व्या षटकात त्याला एजाज पटेलने माघारी पाठवले. भारतीय संघाचा डाव मधल्या काही षटकांत ढासळला मात्र मयंक अग्रवाल आणि साहाने महत्त्वाची भागीदारी नोंदवून भारतीय संघाला मजबत स्थितीत पोहचवले.

तर न्यूझीलंडकडून एजाज पटेल वगळता कोणत्याच गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. एजाजने २९ षटकांत ७३ धावा देऊन ४ बळी पटकावले.


हे ही वाचा: http://IND vs NZ 2nd Test : पंचाच्या चुकीच्या निर्णयानंतर विराटचा राग अनावर; काय झाले पहा व्हिडिओ


 

First Published on: December 3, 2021 6:34 PM
Exit mobile version