भारत-पाकिस्तान क्रिकेट युद्ध; जय शाहांच्या वक्तव्यानंतर ‘पीसीबी’ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

भारत-पाकिस्तान क्रिकेट युद्ध; जय शाहांच्या वक्तव्यानंतर ‘पीसीबी’ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

टी-20 विश्वचषकाला सुरूवात झाली असून, येत्या 23 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटयुद्ध सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यामध्ये वाद सुरू आहे. बीसीसीआय सचिव जय शाहा यांनी भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यासाठी जाणार नाही, असे वक्तव्य केले. त्यानंतर आम्हीही पाकिस्तानचा संघ 2023 मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पाठवणार नाही, अशी भूमिका पीसीबीकडून घेण्यात येणार असल्याची माहिती मिळते. (India vs Pakistan BCCI PCB Pakistan Cricket Board talk on BCCI Secretary Jay Shah)

आशिया चषक 2023 पाकिस्तानात होणार असल्याचं समोर आल्यानंतर भारत या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नाही अशी स्पष्ट घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाहा यांनी केली आहे. तसेच, ही आशिया स्पर्धा दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी घ्यावी, अशी मागणी शाहा यांनी केली. जय शाहा यांच्या या वक्तव्यानंतर पीसीबीकडून एक तातडीची बैठक बोलावण्यात आली होती.

या बैठकीत जर भारतीय क्रिकेट बोर्ड 2023 मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी संघ पाठवण्यास तयार नसेल, तर पाकिस्तानही भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी संघ पाठवणार नाही, असा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

याशिवाय, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड याबाबत एसीसीला (ACC) पत्र पाठवून पुढील महिन्यात मेलबर्नमध्ये तातडीची बैठक बोलवण्याची मागणी करणार असल्याचे समजते.

बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेत जय शाह यांनी ही घोषणा केली. बीसीसीआयचे 36 वे अध्यक्ष 1983 च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य आणि माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी झाले असून, या निर्णयासाठी बीसीसीआयची 91 वी सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी इतरही विषयांवर चर्चा झाली.


हेही वाचा – पाकिस्तानात भारतीय संघ खेळणार नाही; BCCIचे सचिव जय शाहांचे स्पष्ट मत

First Published on: October 19, 2022 3:36 PM
Exit mobile version