कसोटी पाठोपाठ एकदिवसीय मालिकाही भारताने जिंकली

कसोटी पाठोपाठ एकदिवसीय मालिकाही भारताने जिंकली

एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ ने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.

युजवेंद्र चहलच्या ६ विकेट तसेच महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना ७ विकेट राखून जिंकत ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा द्विदेशीय एकदिवसीय मालिका जिंकण्याचा इतिहास रचला. याआधी भारताला ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विदेशीय मालिका जिंकता आलेली नव्हती. ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रमही भारताने याच दौऱ्यात केला.

चहलची भेदक गोलंदाजी

तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून ढगाळ वातावरणात प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भुवनेश्वर कुमारने ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर अॅलेक्स कॅरी (५) आणि अॅरॉन फिंच (१४) यांना झटपट माघारी पाठवले. यानंतर उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्श यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. ३९ धावांवर मार्शला बाद करत लेगस्पिनर चहलने ही जोडी फोडली. या दोघांनी ७३ धावांची भागीदारी केली. चहलनेच मग ख्वाजा (३४) आणि स्टोइनिस (१०) यांना बाद केले. तर मॅक्सवेलही आक्रमक २६ धावा करून माघारी परतला. यानंतर पीटर हॅंड्सकोम्बने जाय रिचर्डसनच्या साथीने चांगली फलंदाजी केली. दरम्यान त्याने अर्धशतकही पूर्ण केले. पुढे चहलने पुन्हा आपली जादू चालवली. त्याने रिचर्डसन (१६) आणि हॅंड्सकोम्ब (५८) यांना बाद करत आपल्या ५ विकेट पूर्ण केल्या. मग त्यानेच अॅडम झॅम्पालाही बाद केले. त्यामुळे त्याने मेलबर्नमध्ये भारतीय गोलंदाजाने केलेल्या सर्वोत्तम कामगिरीच्या अजित आगरकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. तर मोहम्मद शमीने बिली स्टॅन्लेकला बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव २३० धावांत संपवला.

हे वाचा – मार्चमध्ये होऊ शकते लोकसभा निवडणुकीची घोषणा!

धोनी, जाधवची कमाल

२३१ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या ९ धावा करून माघारी परतला. तर शिखर धवनला २३ धावांवर स्टोइनिसने बाद केले. यानंतर चौथ्या क्रमांकावर खेळायची संधी मिळालेल्या महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांनी चांगली फलंदाजी केली. या दोघांनी मोठे फटके मारणे टाळले. पण त्यांनी १-२ धावा काढत भारताचा धावफलक हलता ठेवला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. मात्र रिचर्डसनला खराब फटका मारून कोहली ४६ धावांवर बाद झाला. यानंतर धोनी आणि या मालिकेत पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळालेल्या केदार जाधवने अप्रतिम फलंदाजी केली. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना विकेट घेण्याची संधीच दिली नाही. दरम्यान धोनीने या मालिकेतील तिसरे आणि कारकिर्दीतील ७० वे अर्धशतक पूर्ण केले. त्याला केदारने अर्धशतक करत चांगली साथ दिली. भारताला अखेरच्या षटकात एका धावेची गरज असताना केदारने चौकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कमोर्तब केले. धोनी ११४ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने ८७ तर केदार ५७ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ६१ धावांवर नाबाद राहिला. चहलला सामनावीराचा तर धोनीला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.

 


 

 

First Published on: January 18, 2019 9:02 PM
Exit mobile version