द.आफ्रिका चारो खाने चीत!

द.आफ्रिका चारो खाने चीत!

कर्णधार विराट कोहलीचे द्विशतक आणि गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारताने दुसर्‍या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर १ डाव आणि १३७ धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली. कोहलीचा हा कर्णधार म्हणून ५० वा कसोटी सामना होता आणि त्याला आपला ३० वा विजय मिळवण्यात यश आले. तसेच कोहलीच्या नेतृत्वात घरच्या मैदानावर भारताचा हा सलग ११ वा मालिका विजय होता. त्यामुळे त्यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला.

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ६०१ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. याचे उत्तर देताना तिसर्‍या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २७५ धावांवर आटोपला होता. त्यामुळे भारताकडे ३२६ धावांची आघाडी होती. चौथ्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या दुसर्‍या डावाचीही खराब सुरुवात झाली. सलामीवीर एडन मार्करमला ईशांत शर्माने दुसर्‍याच चेंडूवर पायचीत पकडले. उमेश यादवने तिसर्‍या क्रमांकावरील थानीस डी ब्रूनला ८ धावांवर माघारी पाठवले. यानंतर कर्णधार फॅफ डू प्लेसिस आणि डीन एल्गर यांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संयमाने फलंदाजी करत तिसर्‍या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. मात्र, रविचंद्रन अश्विनने सलग दोन षटकांत डू प्लेसिस (५) आणि एल्गरला (४८) माघारी पाठवले.

क्विंटन डी कॉकचा ५ धावांवर डावखुर्‍या जाडेजाने त्रिफळा उडवला. उपकर्णधार टेंबा बवूमाने एक बाजू लावून धरत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३८ धावा केल्या, पण त्यालाही जाडेजाने माघारी पाठवले. पहिल्या डावात १०९ धावांची भागीदारी करणार्‍या केशव महाराज आणि व्हर्नोन फिलँडर यांनी दुसर्‍या डावातही भारतीय गोलंदाजांना झुंज दिली. त्यांनी आठव्या विकेटसाठी ५६ धावा जोडल्या. परंतु, उमेशने फिलँडरला ३७ धावांवर, तर कागिसो रबाडाला ४ धावांवर माघारी पाठवले. अखेर जाडेजाने २२ धावांवर महाराजला पायचीत पकडले आणि दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १८९ धावांवर संपवला. त्यामुळे भारताने हा सामना १ डाव आणि १३७ धावांनी जिंकला. पहिल्या डावात नाबाद २५४ धावा करणार्‍या कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. आता या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना रांची येथे १९ ऑक्टोबरपासून होणार आहे.

संक्षिप्त धावफलक –

भारत : ५ बाद ६०१ डाव घोषित विजयी वि. दक्षिण आफ्रिका : २७५ आणि १८९ (डीन एल्गर ४८, टेंबा बवूमा ३८, व्हर्नोन फिलँडर ३७, केशव महाराज २२; उमेश यादव ३/२२, रविंद्र जाडेजा ३/५२, रविचंद्रन अश्विन २/४५).

सलग ११ वा मालिका विजय

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेला दुसरा कसोटी सामना जिंकत भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिकाही खिशात घातली. विराट कोहलीच्या नेतृत्वात घरच्या मैदानावर भारताचा हा सलग ११ वा मालिका विजय होता. त्यामुळे भारताने नव्या विक्रमाची नोंद केली. याआधी ऑस्ट्रेलियाने दोन वेळा (१९९४-२००१ आणि २००४-२००८) सलग १० मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. २०१२-१३ मध्ये झालेल्या ’बॉर्डर-गावस्कर’ मालिकेत भारताने ११ पैकी आपला पहिला मालिका विजय मिळवला होता.

First Published on: October 14, 2019 4:44 AM
Exit mobile version