IND vs ENG : भारताने ‘पुन्हा’ घेतली इंग्लंडची फिरकी; तिसऱ्या कसोटीत १० विकेट राखून विजयी 

IND vs ENG : भारताने ‘पुन्हा’ घेतली इंग्लंडची फिरकी; तिसऱ्या कसोटीत १० विकेट राखून विजयी 

अक्षर पटेल, विराट कोहली, अश्विन

डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल आणि ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने चेन्नई पाठोपाठ अहमदाबादमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांची फिरकी घेतली. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेला डे-नाईट कसोटी सामना भारताने १० विकेट राखून जिंकला. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. त्यामुळे भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या एक पाऊल जवळ पोहोचला आहे. अहमदाबाद येथे झालेला तिसरा कसोटी सामना भारताने दुसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्रातच जिंकला. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात हा सर्वात कमी वेळात आटोपलेला कसोटी सामना ठरला.

रूटच्या ८ धावांतच ५ विकेट

या सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या ११२ धावांत आटोपला होता आणि याचे उत्तर देताना भारतीय संघ पहिल्या दिवसअखेर ३ बाद ९९ असा सुस्थितीत होता. दुसऱ्या दिवशी मात्र फिरकीपटूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. जॅक लिच आणि कर्णधार जो रूट या इंग्लंडच्या फिरकीपटूंनी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकले. दिवसाच्या सुरुवातीलाच लिचने रोहित (६६) आणि अजिंक्य रहाणे (७) यांना झटपट माघारी पाठवले. यानंतर अश्विन (१७) आणि ईशांत शर्मा (१०) यांच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. त्यामुळे भारताचा पहिला डाव १४५ धावांत आटोपला आणि त्यांना केवळ ३३ धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडकडून कर्णधार रूटने ८ धावांतच ५ विकेट घेतल्या. त्याला लिचने ५४ धावांत ४ विकेट घेत चांगली साथ दिली.

अक्षरच्या सामन्यात ११ विकेट

इंग्लंडच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावातही निराशा केली. अक्षरने पहिल्याच षटकात झॅक क्रॉली आणि जॉनी बेअरस्टो यांना खातेही न उघडता माघारी पाठवले. त्यानेच मग डॉम सिबली (७) आणि कर्णधार जो रूट (१९) यांनाही बाद केले. अश्विनने बेन स्टोक्स, ऑली पोप आणि जोफ्रा आर्चर यांना बाद करत कसोटी कारकिर्दीत ४०० विकेट पूर्ण केल्या. अखेर इंग्लंडचा दुसरा डाव ८१ धावांत आटोपला. या डावात अक्षरने ३२ धावांत ५ गडी बाद केले. भारताला सामना जिंकण्यासाठी ४९ धावांचे आव्हान मिळाले. रोहित शर्माने नाबाद २५, तर शुभमन गिलने नाबाद १५ धावांची खेळी केल्याने भारताने ४९ धावांचे लक्ष्य एकही विकेट न गमावता गाठले. सामन्यात ११ विकेट घेणाऱ्या अक्षरला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.


संक्षिप्त धावफलक – इंग्लंड : ११२ (क्रॉली ५३; अक्षर ६/३८, अश्विन ३/२६) आणि ८१ (स्टोक्स २५; अक्षर ५/३२, अश्विन ४/४८) पराभूत वि. भारत : १४५ (रोहित ६६; रूट ५/८, लिच ४/५४) आणि बिनबाद ४९ (रोहित नाबाद २५, गिल नाबाद १५).

First Published on: February 25, 2021 9:51 PM
Exit mobile version