एशियन पावरलिफ्टिंग स्पर्धेत मुंबईतील व्यावसायिकाचं यश

एशियन पावरलिफ्टिंग स्पर्धेत मुंबईतील व्यावसायिकाचं यश

राजस्थानातील उदयपूर येथे नुकत्याच झालेल्या एशियन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मुंबईतील राजेंद्र सावंत यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. देशाचे नाव राखणारा हा खेळाडू मुळात फक्त खेळाडू नसून, तो एक व्यवसायिक देखील आहे. मात्र खेळाची आवड असल्यामुळे त्याने वयाच्या ५२ व्या वर्षी या स्पर्धेत तीन पदक मिळवली.

गेली ३५ वर्षे राजेंद्र सावंत माझगांव येथील भारत व्यायाम शाळेत सराव करतात. दररोज पहाटे २ तास आणि सांयकाळी ३ तास ते व्यायामाचा सराव करतात. या स्पर्धेसाठी त्यांनी कसून तयारी केली होती. आंतराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या सामन्यात एकूण १७ देशांतील ३६० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. मात्र आपल्याला ही स्पर्धा जिंकायचीच, असा राजेंद्र यांनी निश्चय केला होता. यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेऊन या स्पर्धेत १ सुवर्ण तर २ रौप्य पदक मिळवले. ही स्पर्धा जिंकण्यासाठी त्यांनी मास्टर कॅटेगरीमध्ये एकूण ४८२.५ किलो वजन उचलले.

वय पन्नाशीच्या पुढे गेले की माणूस शक्यतो खेळाडू म्हणून मैदानात उतरत नाही. खेळाडूंना वयाची मर्यादा असते. मात्र व्यायामाची आवड असल्यामुळे मी नेहमी अनेक स्पर्धेत भाग घेतो. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी मला विशेष तयारी करावी लागली. स्पर्धेत भाग घेऊन जिंकण्यासाठी खूप सराव केला. कारण ३६० खेडाळूंना हरवून पहिला क्रमांक मिळवण्याचा निर्धार मी केला होता. या विजया मागे माझे प्रशिक्षक संजय रहाटे, संतोष बांद्रे, विनोद कांबळे यांचा मोलाचा हातभार आहे. त्याच सोबत माझ्या कुटुंबाने देखील मला खूप सपोर्ट केला. – राजेंद्र सावंत, खेळाडू

First Published on: May 14, 2018 9:58 AM
Exit mobile version