इराण कायदा सक्तीमुळे सौम्याचा चॅम्पियनशिपला नकार

इराण कायदा सक्तीमुळे सौम्याचा चॅम्पियनशिपला नकार

बुद्धिबळपटू सौम्या स्वामीनाथन

महिला ग्रॅण्डमास्टर आणि माजी ज्यूनिअर चॅम्पियन सौम्या स्वामीनाथन हिने एशियन (बुद्धिबळ) चॅम्पिअनशिपमधून माघार घेतली आहे. इराणमधील कायद्याच्या सक्तीमुळे सौम्याला हे पाऊल उचलावे लागले आहे. इराणमध्ये २६ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान एशियन चॅम्पिअनशिपचे आयोजन करण्यात आले आहे. या चॅम्पिअनशिपमध्ये बुरखा किंवा स्कार्फ घालणं बंधनकारक असल्याने सौम्याने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. सौम्या ही भारताची क्रमांक ५ ची बुद्धिबळपटू आहे.

फेसबुकवर पोस्टद्वारे व्यक्त केली खदखद

“मला जबरदस्तीने स्कार्फ किंवा बुरखा घालायचा नाही. इराणी कायद्यानुसार जबरदस्तीने बुरखा किंवा स्कार्फ घालणं माझ्या मूलभूत मानवी हक्काचं सगळं उल्लंघन आहे. हे माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्यासह विवेक आणि धर्माचं उल्लंघन आहे. अशा परिस्थितीत मी माझ्या अधिकारांची सुरक्षा करण्यासाठी माझ्याकडे दुसरा कुठलाही रस्ता नसल्याने मी इराणला जाणार नाही”
– सौम्या स्वामीनाथन, बुद्धिबळपटू खेळाडू, फेसबुकवर पोस्ट


‘… काही गोष्टींमध्ये तडजोड करता येत नाही’ 

‘राष्ट्रीय संघात निवड झाल्यावर मी जेव्हा भारताचं प्रतिनिधित्व करते तेव्हा ते माझ्यासाठी अभिमानस्पद असतं. इतक्या मोठ्या स्पर्धेत मला सहभागी होण्यास मी असमर्थ ठरल्याचं मला दुःख आहे. एका खेळाडूसाठी खेळ ही गोष्ट त्याच्या आयुष्यात सर्वात पहिले महत्त्वाची ठरते. त्यासाठी अनेक तडजोडी कराव्या लागतात. पण काही गोष्टी अशा असतात ज्यामध्ये तडजोड करता येत नाही’, असंही तिने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

बांगलादेशऐवजी इराणमध्ये स्पर्धा

एशियन चॅम्पियनशिप स्पर्धा आधी बांगलादेशमध्ये होणार होती. त्याच्या तारखाही जाहीर झाल्या होत्या. मात्र नंतर त्याची जागा आणि तारखा दोन्ही बदलण्यात आल्या. इराणमध्ये चॅम्पियनशिप होणार असल्यानेच माघार घेत असल्याचे सौम्याने सांगितले. यासंबंधी ‘ऑल इंडिया चेस फेडरेशन’ने अद्याप कोणतीही भूमिका मांडलेली नसून हा आपला वैयक्तिक निर्णय असल्याचे सौम्याने म्हटले आहे. यापूर्वी २०१६ मध्येही महिला शूटर हिना सिद्धूने एशियन एयरगन चॅम्पियनशिपमधून माघार घेतली होती. इराणमधील स्पर्धेत बुरखा परिधान करण्यास तिने नकार दिला होता.

First Published on: June 13, 2018 7:41 AM
Exit mobile version