भारताच्या प्रशिक्षकाचे वय ६० पेक्षा कमीच हवे!

भारताच्या प्रशिक्षकाचे वय ६० पेक्षा कमीच हवे!

बीसीसीआय कार्यालय (फोटो - डेक्कन हेराल्ड)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी पुरुषांच्या संघासाठी मुख्य प्रशिक्षकांसह सहाय्यक प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवले आहेत. मात्र, ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा किमान २ वर्षे अनुभव असलेली व्यक्तीच प्रशिक्षकपदासाठी अर्ज भरू शकणार आहे. मुख्य प्रशिक्षकांसह फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, तसेच फिजिओ, ट्रेनर आणि प्रशासकीय व्यवस्थापक यासाठी बीसीसीआयने नव्याने अर्ज मागवले असून अर्ज भरण्यासाठी ३० जुलै, संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.

२०१७ मध्ये रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती होण्याआधी बीसीसीआयने ९ अटींची एक यादी तयार केली होती. मात्र, त्या यादीतील काही गोष्टींबद्दल संभ्रम होता. यंदाच्या यादीत मात्र केवळ ३ अटी ठेवण्यात आल्या आहेत. तसेच सध्याचे प्रशिक्षक नव्या प्रशिक्षकपदाच्या मुलाखतीसाठी आपोआपच निवडले गेले आहेत, अशी माहितीही बीसीसीआयने दिली आहे. मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणार्‍या व्यक्तीने किमान २ वर्षांसाठी एखाद्या कसोटी दर्जा प्राप्त असलेल्या संघाचे प्रशिक्षकपद भूषवले असायला हवे किंवा आयसीसीचे संलग्न सदस्य संघ/ ’अ’ संघ/ आयपीएल संघाचे किमान ३ वर्षे प्रशिक्षकपदाचा अनुभव हवा. तसेच अर्जदाराला ३० कसोटी सामने किंवा ५० एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव हवा.

भारतीय संघाचा लवकरच वेस्ट इंडिज दौरा सुरू होणार असल्याने सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सहाय्यक प्रशिक्षक यांना ४५ दिवसांचा वाढीव कालावधी देण्यात आला आहे. हे सर्व सदस्य पुन्हा आपापल्या पदांसाठी अर्ज करू शकतात. मात्र, भारतीय संघाला नवे फिटनेस ट्रेनर आणि फिजिओ मिळणार आहेत, हे निश्चित आहे.

First Published on: July 17, 2019 4:16 AM
Exit mobile version