टीम इंडियाला सलग तिसर्‍यांदा मानाची गदा

टीम इंडियाला सलग तिसर्‍यांदा मानाची गदा

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली

भारतीय क्रिकेट संघाने मागील काही वर्षांत अप्रतिम कामगिरी केली आहे. भारताने काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचाही विक्रम केला होता. त्यामुळे भारताने सलग तिसर्‍या वर्षी मानाची गदा आपल्याकडे राखली आहे. १ एप्रिलला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असल्याने भारतीय संघाला मानाची गदा आणि १० लाख अमेरिकन डॉलरचे बक्षिस मिळाले आहे. कसोटी क्रमवारीत भारत ११६ गुणांसह अव्वल स्थानी आहे, तर न्यूझीलंड संघ १०८ गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे.

सलग तिसर्‍यांदा ही गदा मिळवल्यानंतर आनंद व्यक्त करताना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला, आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपची गदा राखणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आमच्या संघाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारांमध्ये चांगली कामगिरी केली आहे, मात्र कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असल्याचा आम्हाला जरा अधिक आनंद मिळतो.

आम्हाला कसोटी क्रिकेटचे महत्त्व कळते आणि कसोटी क्रिकेटमध्ये फक्त सर्वोत्तम खेळाडूच यशस्वी होऊ शकतात याची आम्हाला कल्पना आहे. आमच्याकडे कसोटी क्रिकेट खेळू शकतील असे बरेच खेळाडू उपलब्ध आहेत आणि काही महिन्यांत सुरु होणार्‍या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये आम्हाला याचा फायदा होईल. या स्पर्धेची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत आणि या स्पर्धेचा कसोटी क्रिकेटला फायदा होईल असे मला वाटते.

काही महिन्यांत सुरु होणार्‍या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये एकूण २७ मालिका आणि ७१ सामने होणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना २०२१ साली होईल.

First Published on: April 2, 2019 4:12 AM
Exit mobile version