भारताचे गोलंदाज बाऊंसरने आम्हाला अडचणीत टाकणार नाहीत- मॅथ्यू वेड

भारताचे गोलंदाज बाऊंसरने आम्हाला अडचणीत टाकणार नाहीत- मॅथ्यू वेड

मॅथ्यू वेड

विराट कोहलीचा भारतीय संघ यावर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियामध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला अजून काही महिने शिल्लक असले तरी चाहते आणि दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. प्रतिस्पर्धी संघाची काय योजना असेल याचा दुसऱ्या संघातील खेळाडू अंदाज लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील मोसमात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळली होती. या मालिकेत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज निल वॅग्नर उसळी घेणाऱ्या चेंडूंचा (बाऊंसर) भडीमार करत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना चांगलेच अडचणीत टाकले होते. आता भारताचे गोलंदाजही ऑस्ट्रेलियाविरुद्ध याच योजनेने गोलंदाजी करू शकतील असे म्हटले जात आहे. परंतु, भारताचे गोलंदाज वॅग्नरप्रमाणे आम्हाला अडचणीत टाकू शकणार नाही, असे मत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मॅथ्यू वेडने व्यक्त केले.

‘ते’ वॅग्नर इतके यशस्वी होणार नाहीत

आमच्याविरुद्ध वॅग्नरने ज्याप्रकारे गोलंदाजी केली, त्याचे अनुकरण करण्याचा इतर संघातील गोलंदाज प्रयत्न करतील. मात्र, त्यांना त्याच्याइतके यश मिळणार नाही. वॅग्नर ज्याप्रकारे उसळी घेणारे चेंडू टाकतो, तसे जागतिक क्रिकेटमध्ये इतर कोणताही गोलंदाज टाकत नाही. तो सातत्याने योग्य टप्प्यावर चेंडू टाकतो, विकेट्स घेतो आणि धावाही करू देत नाही. आता भारताचे गोलंदाजही त्याच्याप्रमाणे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतील. मात्र, ते वॅग्नर इतके यशस्वी होणार नाहीत. ते आम्हाला उसळी घेणाऱ्या चेंडूने वॅग्नरप्रमाणे अडचणीत टाकणार नाहीत. अगदी खरे सांगायचे, तर वॅग्नरसारखी उसळी घेणारे चेंडू टाकण्याची क्षमता मी इतर कोणत्याही गोलंदाजात पाहिलेली नाही, असे वेड म्हणाला.

भारताविरुद्ध खेळणे आव्हानात्मक

भारतीय संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळणे आणि जिंकणे आव्हानात्मक असेल असे मॅथ्यू वेडला वाटते. आमचा प्रत्येक खेळाडू भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहे. त्यांच्याविरुद्ध खेळणे आणि जिंकणे आव्हानात्मक असेल. त्यांच्या संघात उत्कृष्ट खेळाडू असून ते कोणत्याही आव्हानासाठी तयार असतात. ते चांगली झुंज देतात. त्यांचा कर्णधार विराट कोहली हा आक्रमक वृत्तीचा आहे. तो जिंकण्यासाठीच खेळतो. तो स्वतः दमदार कामगिरी करुन इतर खेळाडूंसमोर आदर्श ठेवतो आणि तेसुद्धा त्याला साथ देतात. त्यामुळे आम्हाला जिंकण्यासाठी सर्वोत्तम खेळच करावा लागेल, असे वेडने नमूद केले.

First Published on: August 1, 2020 1:30 AM
Exit mobile version