भारतीय हॉकी संघांची जागतिक क्रमवारीत झेप

भारतीय हॉकी संघांची जागतिक क्रमवारीत झेप

भारतीय हॉकी

भारतीय पुरूष तसेच महिला हॉकी संघाने आपल्या जागतिक क्रमवारीत एका स्थानाची सुधारणा करत बढत घेतली आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या FIH रँकीगमध्ये ही बढत घेतली असून पुरूष संघ पाचव्या तर महिला संघ नवव्या स्थानावर विराजमान झाला आहे. ही सुधारणा पुरूष हॉकी संघाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील कामगिरीमुळे झाली आहे. तर महिला हॉकी संघाच्या विश्वचषकातील अप्रतिम खेळामुळे संघाच्या स्थानात ही बढत झाली आहे.

पुरूष संघ जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर

मागील महिन्यात पार पडलेल्या पुरूषांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघाने अंतिम सामन्यापर्यंत झेप घेत रौप्यपदक पटकावले होते. भारतीय संघाच्या याच अप्रतिम कामगिरीमुळे संघाच्या जागतिक क्रमवारीत सुधारणा झाली असून भारताचा संघ १४८४ गुणांसह आता पाचव्या स्थानावर विराजमान झाला आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या संघांने भारताला अंतिम सामन्यात मात दिल्यामुळे त्यांचा संघ १९०६ गुणांसह पहिल्या स्थानी आहे.

भारतीय पुरूष हॉकी संघ

महिला संघांच्या क्रमवारीतही सुधारणा

काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या महिला हॉकी विश्वचषकात भारतीय महिला संघाने अप्रतिम कामगिरी करत उपांत्यापूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. संघाच्या याच कामगिरीचा फायदा जागतिक क्रमवारीतील स्थानात सुधारणा होण्यात झाला आहे. महिला संघाने कोरिया संघाला मागे टाकत ११३८ गुणांसह नवव्या स्थानी झेप घेतली असून भारताचा संघ आशियाई संघात अव्वल स्थानी आहे.


भारतीय हॉकी संघांच्या या कामगिरीनंतर आता आशियाई खेळात संघ कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

First Published on: August 8, 2018 2:13 PM
Exit mobile version