IND vs ENG : भारताच्या खेळाडूंना ‘या’ कारणामुळे ठोठावण्यात आला दंड  

IND vs ENG : भारताच्या खेळाडूंना ‘या’ कारणामुळे ठोठावण्यात आला दंड  

भारतीय संघाला दंड

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना रविवारी पार पडला. पहिला सामना गमावणाऱ्या भारताने दुसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन केले. दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने इंग्लंडला १६४ धावांवर रोखले आणि १६५ धावांचे लक्ष्य ७ विकेट राखून गाठत सामना जिंकला. मात्र, या सामन्यात षटकांची गती न राखल्याने (स्लो ओव्हर-रेट) भारताच्या खेळाडूंना दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांच्या सामन्याच्या मानधनातून २० टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात आली आहे. २० षटके पूर्ण करण्यासाठी दिलेल्या वेळात भारतीय संघाला १९ षटके टाकता आली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एलिट पॅनलचे सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी भारतीय संघाला दंड ठोठावला आहे.

किशन, कोहलीची अर्धशतके 

भारतीय संघाने रविवारी झालेला दुसरा टी-२० सामना ७ विकेट राखून जिंकला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १६४ अशी धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना भारताकडून पदार्पण करणाऱ्या ईशान किशनने ३२ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५६ धावांची खेळी केली. त्याला कर्णधार विराट कोहलीने ४९ चेंडूत नाबाद ७३ धावांची खेळी करत उत्तम साथ दिली. तसेच रिषभ पंतनेही १३ चेंडूत २६ धावा केल्याने भारताने १३ चेंडू राखून हा सामना जिंकला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली.

 

First Published on: March 15, 2021 10:54 PM
Exit mobile version