मला धोनीची कमी जाणवते; अखेर भारतीय फिरकीपटूने केले मान्य

मला धोनीची कमी जाणवते; अखेर भारतीय फिरकीपटूने केले मान्य

मला धोनीची कमी जाणवते; अखेर भारतीय फिरकीपटूने केले मान्य

भारताचा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवला मागील काही काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. २०१९ साली इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत कुलदीप हा भारताचा प्रमुख फिरकीपटू होता. मात्र, त्यानंतर त्याची कामगिरी सातत्याने खालावली आहे. त्यामुळे आता त्याने कसोटी संघातील स्थानही गमावले आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी नुकतीच भारताच्या २० सदस्यीय कसोटी संघाची निवड झाली आणि यात कुलदीपला स्थान मिळाले नाही. तसेच एकदिवसीय आणि टी-२० संघातील त्याचे स्थानही धोक्यात आहे. मागील काही काळात सर्वोत्तम कामगिरी करण्यात अपयश आल्याचे आता कुलदीपने स्वतःच मान्य केले असून त्याला यष्टींमागे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची उणीव भासत आहे.

यष्टींमागून मार्गदर्शन करायचा

मला काही वेळा धोनीची आणि त्याच्या मार्गदर्शनाची उणीव भासते. त्याच्या गाठीशी खूप अनुभव आहे. त्यामुळे कोणत्या परिस्थितीत कशी गोलंदाजी केली पाहिजे हे त्याला ठाऊक आहे. तो आम्हाला (गोलंदाजांना) यष्टींमागून मार्गदर्शन करायचा. आम्हाला सल्ले द्यायचा आणि सतत सूचना करत राहायचा. त्यामुळे त्याच्या अनुभवाची आम्हाला आता नक्कीच कमी जाणवते, असे कुलदीप म्हणाला.

सातत्याने संधी मिळत नाही

धोनी संघात असताना मला आणि युजवेंद्र चहलला एकत्र खेळण्याची संधी मिळत होती. परंतु, धोनीच्या निवृत्तीनंतर आम्ही एकत्र खेळलेलो नाही. मला स्वतःलाच केवळ नऊ-दहा सामने खेळायला मिळाले असतील. त्यापैकी एका सामन्यात मी हॅटट्रिकही घेतली होती. त्यामुळे तुम्ही माझ्या कामगिरीवर नजर टाकल्यास तुम्हाला जाणवेल की मी चांगला मारा केला आहे. आम्ही कोणत्या संघाविरुद्ध खेळलो हे पाहणेही महत्वाचे आहे. मात्र, असे असतानाही मला सातत्याने संधी मिळत नाही, असेही कुलदीपने एका मुलाखतीत सांगितले.

 

First Published on: May 12, 2021 4:50 PM
Exit mobile version