भारतीय टेबल टेनिस संघाला एअर इंडियाच्या विमानात ‘नो एन्ट्री’!

भारतीय टेबल टेनिस संघाला एअर इंडियाच्या विमानात ‘नो एन्ट्री’!

टेबल टेनिस स्टार मणिका बत्रा

भारताची टेबल टेनिस स्टार मनिका बत्रा आणि अन्य ६ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंना इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकून रहावे लागले होते. मेलबर्नला जाणाऱ्या त्यांच्या ठरलेल्या विमानात जाण्यापासून एअर इंडियाने त्यांना रोखले होते. नंतर एअर इंडियाकडून एक पर्यायी विमान त्यांना उपलब्ध करून दिले गेले खरे, मात्र त्यांचा बराच वेळ विमानतळावर वाया गेला. या सर्व प्रकाराबाबत एअर इंडियाला विचारले असता खेळाडूंच्या विमानतळावर उशीरा येण्यामुळे आणि वेगवेगळ्या ‘पीएनआर’ अंतर्गत केल्या गेलेल्या बुकिंगमुळे त्यांना विमानात जागा देता आली नसल्याचे एअर इंडियाने सांगितले.

ओव्हरबुक विमानामुळे प्रवेश नाकारला

भारताकडून १७ खेळांडूचे पथक मेलबर्नला ‘आयटीटीएफ वर्ल्ड टूर ऑस्ट्रेलियन ओपन’ या स्पर्धेसाठी चालले होते. १७ खेळाडूंपैकी केवळ १० खेळाडूंना विमानात जागा मिळाली आणि अन्य ७ खेळाडूंना विमान ओव्हरबुक्ड झाल्याचे सांगत विमानात चढण्यापासून नाकारले गेले. या ७ खेळाडूंमध्ये भारताची टेबल टेनिस स्टार मनिका बत्रा सोबतच अनुभवी खेळाडू मौमा दास देखील होती.

विमानात प्रवेश नाकारल्यानंतर मनिकाने आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून एक पोस्ट टाकली, ज्यात मनिकाने लिहीले की, “एअर इंडियाच्या काउंटरवर पोहचल्यानंतर आम्हाला सांगण्यात आले की विमान ओव्हरबुक झाले आहे आणि आमच्यापैकी १० खेळाडूंनाच विमानात प्रवेश मिळाला आणि मी आणि इतर ६ खेळाडूंना विमानात प्रवेश मिळाला नाही. एअर इंडियाच्या या वागण्यामुळे आम्ही सगळेच अचंबित झालो. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सर्व तिकिटं ही बाल्मर लॉरीकडून बुक करण्यात आली होती.”

मनिकाच्या या ट्विटला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळाला. भारताच्या स्पोर्टस ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या संचालिका निलम कपूर यांच्या अथक प्रयत्नांनी नंतर काही तासांतच एका पर्यायी विमानाने मनिका आणि तिच्या सोबतच्या खेळाडूंना पाठवण्यात आले. याबद्दल मनिकाने निलम कपूर यांचे ट्विटरवर एका पोस्टद्वारे आभार देखील मानले. या पोस्टमध्ये मनिकाने आपल्या बोर्डिंग पाससोबतचा एक फोटो देखील टाकला आहे.

First Published on: July 23, 2018 7:00 PM
Exit mobile version