IND vs AUS : आम्ही पुन्हा ऑस्ट्रेलियाला पराभूत करू शकतो -चेतेश्वर पुजारा  

IND vs AUS : आम्ही पुन्हा ऑस्ट्रेलियाला पराभूत करू शकतो -चेतेश्वर पुजारा  

चेतेश्वर पुजारा

विराट कोहलीच्या भारतीय संघाने २०१८-१९ मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. भारताने चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली होती. आता लवकरच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुन्हा चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. मागील मालिकेला मुकलेले डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ हे ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाज यंदाच्या मालिकेत मात्र खेळणार आहेत. त्यामुळे या मालिकेत ऑस्ट्रेलियाचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, भारतीय संघ मागील मालिकेतील कामगिरीची यंदा पुनरावृत्ती करू शकतो, असे भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराला वाटते.

ऑस्ट्रेलियाची फलंदाजी २०१८-१९ मधील मालिकेपेक्षा यंदा मजबूत असणार आहे. त्यामुळे त्यांना नमवण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. मात्र, कोणताही विजय सहजासहजी मिळत नाही. खासकरून तुम्हाला परदेशात जिंकायचे असल्यास खूप मेहनत घ्यावी लागते. स्मिथ, वॉर्नर आणि मार्नस लबूशेन हे फारच उत्कृष्ट खेळाडू आहेत. मात्र, आमच्या गोलंदाजांमध्ये त्यांना बाद करण्याची क्षमता आहे, असे पुजारा म्हणाला.

आमच्या गोलंदाजांची खास गोष्ट म्हणजे ते बराच काळ एकत्र खेळत आहेत. २०१८-१९ आम्ही जेव्हा मालिका जिंकली होती, तेव्हाच्या आणि आताच्या गोलंदाजांच्या फळीत फारसा बदल नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियात यशस्वी होण्यासाठी काय केले पाहिजे हे आमच्या गोलंदाजांना ठाऊक आहे. ते स्मिथ, वॉर्नर आणि लबूशेन यांना झटपट बाद करू शकतात. आम्ही याआधीच्या मालिकेत जसा खेळ होता तसाच यंदाही केल्यास आम्ही नक्कीच पुन्हा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकू शकतो, असेही पुजाराने नमूद केले.

First Published on: November 17, 2020 7:23 PM
Exit mobile version