भारताचे लक्ष्य मालिका विजयाचे

भारताचे लक्ष्य मालिका विजयाचे

भारत वि. विंडीज

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी-२० सामना मंगळवारी पार पडणार आहे. भारताने या मालिकेतील पहिला सामना अगदी आरामात जिंकत या ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. त्यामुळे जर विंडीजला या मालिकेत आपले आव्हान कायम ठेवायचे असेल तर हा सामना त्यांना जिंकावाच लागेल. तर भारताचे लक्ष्य या सामन्यात विजय मिळवत ही मालिका जिंकण्याचे असेल.

या स्टेडियममध्ये होणारा पहिला आंतरराष्ट्रीय सामना

भारताने पहिला टी-२० सामना ५ विकेट राखून जिंकला होता. या सामन्यात कुलदीप यादव आणि पदार्पण करणाऱ्या कृणाल पांड्याच्या फिरकीसमोर विंडीजच्या फलंदाजांनी नांगी टाकली. विंडीजला प्रथम फलंदाजी करताना अवघ्या १०९ धावा करता आल्या होत्या. तर अडखळत्या सुरुवातीनंतर दिनेश कार्तिक आणि कृणालच्या चांगल्या फलंदाजीमुळे भारताने हा सामना जिंकला. या मालिकेतला दुसरा सामना लखनऊच्या एकना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. हा या स्टेडियममध्ये होणारा पहिला आंतरराष्ट्रीय सामना आहे.

खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल

या मैदानाचे क्युरेटर या सामन्याआधी म्हणाले, “ही खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल आहे. या खेळपट्टीवर फिरकीपटूंना चांगली मदत मिळेल. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १३० धावांचा टप्पा पार केला तर तो संघ सामना जिंकेल.” त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही फिरकीचे जास्त पर्याय उपलब्ध असणाऱ्या भारताचे पारडे जड मानले जात आहे. जर विंडीजला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. क्रिस गेल आणि इवन लुईस यांच्या अनुपस्थितीत पोलार्ड, डॅरेन ब्रावो, शिमरॉन हेथमायर आणि शाई होप यांना जास्त जबाबदारीने फलंदाजी करण्याची आवश्यकता आहे. पहिल्या सामन्यात फलंदाजांना अपयश आले असले तरी विंडीजच्या गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले ही विंडीजसाठी चांगली बातमी होती.

जो संघ चांगली फलंदाजी करेल तो संघ सामना जिंकेल

दुसरीकडे भारतीय गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन केले असले तरी कार्तिक आणि कृणाल पांड्या वगळता इतर फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे जर भारताला हा सामना जिंकायचा असेल तर फलंदाजांना आपला खेळ उंचावावा लागेल. एकूणच या दोन्ही संघांच्या गोलंदाजांचे चांगले प्रदर्शन लक्षात घेता जो संघ जास्त चांगली फलंदाजी करेल तो संघ हा सामना जिंकेल.
First Published on: November 6, 2018 3:00 AM
Exit mobile version