मॅरेथॉन धावपटू गोपी जागतिक स्पर्धेसाठी पात्र

मॅरेथॉन धावपटू गोपी जागतिक स्पर्धेसाठी पात्र

मॅरेथॉन धावपटू गोपी

भारताचा आशियाई मॅरेथॉन विजेता गोपी थोनाकल हा दोहा येथे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार्‍या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरला आहे. त्याने सोल, जपान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये ११ वा क्रमांक मिळवला.

जागतिक अ‍ॅथलेटिक्ससाठी पात्र ठरण्यासाठी ही मॅरेथॉन स्पर्धा २ तास १६ मिनिटांच्या आत पूर्ण करणे गरजेचे होते. ३० वर्षीय गोपीने ही मॅरेथॉन स्पर्धा आपली सर्वोत्तम कामगिरी करत २ तास १३ मिनिटे आणि ३९ सेकंदांत पूर्ण केली. याआधी त्याची सर्वोत्तम कामगिरी २ तास १५ मिनिटे आणि १६ सेकंद होती.

तसेच गोपीने ही मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी लावलेला वेळ हा भारतीय मॅरेथॉन धावपटूचा दुसरा सर्वोत्तम वेळ आहे. साधारण ४० वर्षांपूर्वी शिवनाथ सिंगने २ तास आणि १२ मिनिटांची वेळ नोंदवली होती. भारतातील सर्वोत्तम मॅरेथॉन धावपटूंपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोपीने २०१७ मध्ये चीन येथे झालेली आशियाई मॅरेथॉन स्पर्धा जिंकली होती. तसेच २०१६ ऑलिम्पिकमध्ये तो २५ व्या क्रमांकावर आला होता. पुढील वर्षीच त्याने लंडन येथे झालेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता आणि तो २८ व्या क्रमांकावर आला होता.

First Published on: March 19, 2019 4:41 AM
Exit mobile version