मालिका विजेत्या भारताचा तिसर्‍या वन-डेत पराभव

मालिका विजेत्या भारताचा तिसर्‍या वन-डेत पराभव

भारतीय महिला संघ

कॅथरीन ब्रन्टच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंड महिला संघाने तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाचा २ विकेट राखून पराभव केला. मात्र, भारताने पहिले २ सामने जिंकत ही मालिका आधीच जिंकली होती.

तिसर्‍या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. डावाच्या दुसर्‍याच चेंडूवर फलंदाज जेमिमा रॉड्रीग्स खातेही न उघडता बाद झाली, पण त्यानंतर स्मृती मानधना आणि पूनम राऊत यांनी दमदार फलंदाजी करत दुसर्‍या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी रचली. स्मृतीने ७४ चेंडूंत ८ चौकार आणि १ षटकारासह ६६, तर पूनमने ७ चौकारांच्या मदतीने ५६ धावा केल्या. यानंतर मात्र इतर फलंदाजांनी निराशाजनक प्रदर्शन केल्याने भारताला ५० षटकांत ८ विकेट गमावत २०५ धावाच करता आल्या. इंग्लंडकडून कॅथरीन ब्रन्टने २८ धावा देत ५ विकेट घेतल्या.

२०६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झुलन गोस्वामीने अप्रतिम गोलंदाजी करत ३ विकेट घेतल्यामुळे इंग्लंडची ५ बाद ४९ अशी अवस्था होती. यानंतर मात्र कर्णधार हेथर नाईट (४७) आणि डॅनियले वॅट (५६) यांनी सहाव्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी करत इंग्लंडला सावरले. नाइट आणि वॅट बाद झाल्यावर जॉर्जिया इल्विसने नाबाद ३३ धावा करत इंग्लंडला विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक –

भारत : ५० षटकांत ८ बाद २०५ (मानधना ६६, राऊत ५६; ब्रन्ट ५/२८) पराभूत वि. इंग्लंड : ४८.५ षटकांत ८ बाद २०८ (वॅट ५६, नाईट ४७; गोस्वामी ३/४१, शिखा २/३४).

First Published on: March 1, 2019 4:17 AM
Exit mobile version