इंडोनेशिया ओपन टेनिस स्पर्धा

इंडोनेशिया ओपन टेनिस स्पर्धा

सिंधू उपांत्य फेरीत

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने इंडोनेशिया ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष एकेरीत आठव्या सीडेड भारताच्या किदाम्बी श्रीकांतला मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याला हाँगकाँगच्या एनजी का लॉन्ग अँगसने १७-२१, १९-२१ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. तसेच पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टीवर इंडोनेशियाच्या मार्कस गिडीऑन आणि केविन सुकामुलजो या जोडीने २१-१५, २१-१४ अशी मात केली.

महिला एकेरीच्या दुसर्‍या फेरीत भारताच्या सिंधूने डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डचा २१-१४, १७-२१, २१-११ असा पराभव केला. यावर्षी सिंधूकडून पराभूत होण्याची जागतिक क्रमवारीत तेराव्या स्थानी असणार्‍या ब्लिचफेल्डची तिसरी वेळ होती. दुसर्‍या फेरीतील या सामन्याची सुरुवात सिंधूसाठी चांगली झाली नाही आणि पहिल्या गेममध्ये ३-६ अशी ती पिछाडीवर पडली. यानंतर तिने आपल्या खेळात सुधारणा करत हा गेम २१-१४ असा आपल्या खिशात घातला. पहिल्या गेमप्रमाणेच दुसर्‍या गेममध्ये ब्लिचफेल्डने पुन्हा एकदा दमदार सुरुवात करत ९-५ अशी आघाडी मिळवली.

मात्र, सिंधूने पुनरागमन करत १०-१० अशी बरोबरी केली. यानंतर सिंधूने काही चुका केल्या, ज्याचा फायदा ब्लिचफेल्डने घेत हा गेम २१-१७ असा जिंकला. त्यामुळे हा सामना तिसर्‍या आणि निर्णायक गेममध्ये गेला. या गेममध्ये ब्लिचफेल्ड सिंधूला झुंज देण्यात अपयशी ठरली. सिंधूने हा गेम २१-११ असा मोठ्या फरकाने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तिचा या फेरीत तिसर्‍या सीडेड जपानच्या नोझोमी ओकुहाराशी सामना होईल.

First Published on: July 19, 2019 4:16 AM
Exit mobile version