IPL 2021: दीपक हुडाची इन्स्टाग्राम पोस्ट वादात, BCCI करणार चौकशी

IPL 2021: दीपक हुडाची इन्स्टाग्राम पोस्ट वादात, BCCI करणार चौकशी

दीपक हुडाची इन्स्टाग्राम पोस्ट वादात, BCCI करणार चौकशी

पंजाब किंग्जचा अष्टपैलू खेळाडू दीपक हुडाची (Deepak Hooda) इन्स्टाग्राम पोस्ट वादात सापडली असून तो देखील अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. २१ सप्टेंबरला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्याआधी इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे तो बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या रडारवर आला आहे. बीसीसीआयचं भ्रष्टाचार विरोधी पथक दीपक हुडाच्या पोस्टची तपासणी करणार आहे. त्यानंतर त्याची पोस्ट भ्रष्टाचार विरोधी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करते की नाही याची पुष्टी केली जाणार आहे.

बीसीसीआय भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर भूमिका घेतली असून शब्बीर हुसेन शेखादम खंडवावाला यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्टाचारविरोधी युनिट (BCCI-ACU) सध्या यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएलवर बारीक लक्ष ठेवून आहे. दरम्यान, दीपक हुडा त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या रडारवर आला आहे. दीपक हुडाने मंगळवारी दुपारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्याआधी फोटो शेअर केला. ही पोस्ट दुपारी २ वाजता करण्यात आली.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना, एसीयूच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हुडाची इन्स्टाग्राम पोस्ट बीसीसीआय भ्रष्टाचार पथकाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करते की नाही याची तपासणी निश्चितपणे केली जाणार. तसंच, संघ निवडीबद्दल कोणतीही चर्चा केली जाऊ नये, असा नियम असल्याचं देखील त्या अधिकाऱ्यानं सांगितलं.

नियमांनुसार, खेळाडूंनी संघाची प्लेइंग इलेव्हन किंवा इतर काही माहिती सामन्यापूर्वी सोशल मीडियावर शेअर करू नये. त्यामुळे दीपक हुडाने केलेली पोस्ट किती वेळापूर्वी केली होती याची तपासणी केली जाईल. तसंच, या व्यतिरिक्त, त्याने केलेल्या पोस्टमध्ये संघाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही आहे.

First Published on: September 22, 2021 5:19 PM
Exit mobile version