IPL 2021 : जाडेजा, फॅफला राशिद खान रोखणार? आज चेन्नई-हैदराबाद आमनेसामने 

IPL 2021 : जाडेजा, फॅफला राशिद खान रोखणार? आज चेन्नई-हैदराबाद आमनेसामने 

रविंद्र जाडेजा, राशिद खान आणि डेविड वॉर्नर

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद या संघांमध्ये सामना होणार आहे. हा सामना दिल्लीच्या फिरोझ शहा कोटला मैदानावर होईल. चेन्नईने यंदाच्या मोसमात दमदार खेळ केला असून त्यांना पाच पैकी चार सामने जिंकण्यात यश आले आहे. त्यामुळे आयपीएलच्या गुणतक्त्यात चेन्नईचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी मागील सामन्यात गुणतक्त्यात अव्वल स्थानावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत केले होते. या सामन्यात अष्टपैलू रविंद्र जाडेजा मॅचविनर ठरला होता. त्याने फलंदाजीत २८ चेंडूत नाबाद ६२ धावा चोपून काढल्या होत्या. त्याला सलामीवीर फॅफ डू प्लेसिसने अर्धशतक करत चांगली साथ दिली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात त्यांना रोखण्याचे हैदराबादपुढे आव्हान आहे.

जाडेजाचा उत्कृष्ट खेळ

बंगळुरूविरुद्ध चेन्नईकडून जाडेजाने उत्कृष्ट खेळ केला होता. त्याने २८ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ६२ धावांची खेळी केली होती.त्यातच त्याने डावाच्या अखेरच्या षटकात ३७ धावा चोपून काढल्या होत्या. गोलंदाजीत त्याने तीन विकेट घेताना एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे हैदराबादविरुद्ध तो दमदार कामगिरी सुरु ठेवेल अशी चेन्नईला आशा असेल.

विल्यमसनच्या अनुभवाचा फायदा   

दुसरीकडे हैदराबादला यंदा पाच पैकी केवळ एक सामना जिंकता आला आहे. त्यामुळे हा संघ गुणतक्त्यात तळाला आहे. परंतु, मागील दोन सामन्यांत त्यांच्या खेळात सुधारणा दिसली आहे. मागील सामन्यात दिल्लीने त्यांना सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले. अनुभवी केन विल्यमसन संघात आल्याने हैदराबादची फलंदाजी मजबूत झाली आहे. मात्र, मधल्या फळीची अजूनही त्यांना चिंता आहे. गोलंदाजीत लेगस्पिनर राशिद खानने चेन्नईच्या फलंदाजांना अडचणीत टाकल्यास हैदराबादला विजयाची संधी निर्माण होऊ शकेल.

First Published on: April 28, 2021 5:22 PM
Exit mobile version