IPL 2021 : ‘या’ कारणाने आयपीएलच्या उर्वरित मोसमात इंग्लंडच्या खेळाडूंना नो एंट्री!

IPL 2021 : ‘या’ कारणाने आयपीएलच्या उर्वरित मोसमात इंग्लंडच्या खेळाडूंना नो एंट्री!

यंदा पुन्हा आयपीएल झाल्यास इंग्लंडचे खेळाडू त्यात खेळणार नाहीत?

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. मात्र, उर्वरित मोसम यावर्षीच पूर्ण करण्यावर बीसीसीआय, संघमालक, प्रसारक आणि आयोजक यांचे एकमत आहे. परंतु, तो कधी आणि कुठे घ्यायचा? हा प्रश्न आहे. यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-२० वर्ल्डकप होणार असून त्याआधी किंवा नोव्हेंबरनंतर आयपीएलचा मोसम पूर्ण करता येऊ शकेल. मात्र, इंग्लंड संघाचे व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रक लक्षात घेता इंग्लंडचे खेळाडू या स्पर्धेत खेळणार नाहीत, असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे (ECB) डायरेक्टर ऑफ क्रिकेट अ‍ॅशली जाईल्स यांनी स्पष्ट केले.

व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रक

आम्हाला इंग्लंडचे सर्व आघाडीचे खेळाडू राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासाठी उपलब्ध हवे आहेत. आमचे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक व्यस्त आहे. आम्ही पाकिस्तान आणि बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार असून आमचे सर्वोत्तम खेळाडू या दौऱ्यांमध्ये खेळतील अशी मला अपेक्षा आहे, असे जाईल्स म्हणाले. आता स्थगित झालेल्या यंदाच्या आयपीएलमध्ये इंग्लंडचे ११ खेळाडू खेळत होते. इंग्लंडचा संघ सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार असून त्यानंतर टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळेल. तसेच अ‍ॅशेस मालिकाही होणार आहे. त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंना आयपीएलसाठी वेळ काढणे शक्य होईल असे जाईल्स यांना वाटत नाही.

खेळाडूंना पुरेशी विश्रांतीही गरजेची

आयपीएल पुन्हा होणार का, कधी होणार आणि कुठे होणार, हे सांगणे अवघड आहे. मात्र, जूनमध्ये आम्ही न्यूझीलंडविरुद्ध खेळणार असून त्यानंतर आमचे सतत सामने होणार आहेत. आम्हाला टी-२० वर्ल्डकप आणि अ‍ॅशेस मालिकेचे महत्वपूर्ण सामने खेळावे लागणार आहेत. त्यातच इतक्या व्यस्त वेळापत्रकात आम्हाला आमच्या खेळाडूंना पुरेशी विश्रांतीही द्यावी गेले. त्यामुळे आमचे खेळाडू यंदा पुन्हा आयपीएलमध्ये खेळू शकणार नाहीत, असे जाईल्स यांनी नमूद केले.

First Published on: May 11, 2021 4:32 PM
Exit mobile version