IPL 2021 : हरप्रीत ब्रार, बिष्णोईने घेतली RCB ची फिरकी; पंजाब ३४ धावांनी विजयी 

IPL 2021 : हरप्रीत ब्रार, बिष्णोईने घेतली RCB ची फिरकी; पंजाब ३४ धावांनी विजयी 

हरप्रीत ब्रारने घेतली विराट कोहलीची विकेट   

डावखुरा फिरकीपटू हरप्रीत ब्रार आणि लेगस्पिनर रवी बिष्णोई या युवा फिरकीपटूंच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्सने आयपीएलच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर ३४ धावांनी विजय मिळवला. ब्रारने चार षटकांत १९ धावांत ३ विकेट घेतल्या. त्याने बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली (३५), ग्लेन मॅक्सवेल (०) आणि एबी डिव्हिलियर्स (३) यांना बाद केले. त्याला बिष्णोईने १७ धावांत २ विकेट घेत उत्तम साथ दिली. त्यामुळे १८० धावांचा पाठलाग करताना बंगळुरूला २० षटकांत ८ बाद १४५ धावाच करता आल्या. बंगळुरूने सुरुवातीपासूनच विकेट गमावल्या. कोहली (३५), रजत पाटीदार (३१) आणि हर्षल पटेल (३१) यांच्याव्यतिरिक्त इतर फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे बंगळुरूने हा सामना गमावला. हा त्यांचा सात सामन्यांत केवळ दुसरा पराभव ठरला.

कर्णधार राहुलची अप्रतिम खेळी

त्याआधी या सामन्यात कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. पंजाबने २० षटकांत ५ बाद १७९ अशी धावसंख्या उभारली. कर्णधार लोकेश राहुलने अप्रतिम फलंदाजी करताना ५७ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ९१ धावांची खेळी केली. त्याला क्रिस गेल (४६) आणि हरप्रीत (२५) यांची साथ लाभल्याने पंजाबला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले होते.

First Published on: April 30, 2021 11:20 PM
Exit mobile version