IPL 2021 : वरूण चक्रवर्ती काही मिनिटांसाठी बायो-बबलच्या बाहेर, अन् कोरोनाने तिथेच गाठले?

IPL 2021 : वरूण चक्रवर्ती काही मिनिटांसाठी बायो-बबलच्या बाहेर, अन् कोरोनाने तिथेच गाठले?

कोलकाताचा फिरकीपटू वरूण चक्रवर्ती

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील सोमवारी होणारा आयपीएलचा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. फिरकीपटू वरूण चक्रवर्ती आणि वेगवान गोलंदाज संदीप वॉरियर या कोलकाताच्या खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला सुरुवात झाल्यापासून कोणत्याही फ्रेंचायझीच्या खेळाडू किंवा सदस्याला कोरोनाची बाधा झाल्याची ही पहिलीच वेळ आहे. परंतु, ही स्पर्धा बायो-बबलमध्ये सुरु असल्याने खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफला कोरोनाची बाधा होणार नाही, असा बीसीसीआयला विश्वास होता. खेळाडूंना योग्य कारणाशिवाय बायो-बबलच्या बाहेर पडण्याची परवानगी नाही. एका रिपोर्टनुसार, कोलकाताचा फिरकीपटू वरूण चक्रवर्ती मधल्या काळात बायो-बबलमधून बाहेर गेला होता.

खांद्याला झाली होती दुखापत

चक्रवर्तीच्या खांद्याला दुखापत झाली होती. खांद्याचा स्कॅन काढण्यासाठी तो ‘ग्रीन चॅनल’ प्रोटोकॉलच्या आधारे बायो-बबलच्या बाहेर गेला होता. त्यामुळे त्याचा बाहेरील व्यक्तींशी संपर्क आला आणि तिथेच त्याला कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता त्याला आणि संदीप वॉरियरला १० दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.

‘ग्रीन चॅनल’ म्हणेज काय?

आयपीएलच्या ‘ग्रीन चॅनल’ प्रोटोकॉलनुसार, खेळाडूंना स्कॅन काढण्यासाठी किंवा इतर वैद्यकीय उपचार घेण्यासाठी बायो-बबलच्या बाहेर जाता येते. त्यांना एका गाडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात येते. खेळाडूंना बाहेर पडताना पीपीई किट घालावे लागते. तसेच या गाडीत केवळ खेळाडू आणि चालक यांनाच परवानगी असते. तसेच खेळाडूवर उपचार झाल्यावर त्याला पुन्हा त्याच गाडीने बायो-बबलमध्ये परत आणले जाते.

First Published on: May 3, 2021 5:02 PM
Exit mobile version