IPL 2021 : कोरोनाचा कहर! कोलकाता नाईट रायडर्सचे आणखी दोन खेळाडू पॉझिटिव्ह 

IPL 2021 : कोरोनाचा कहर! कोलकाता नाईट रायडर्सचे आणखी दोन खेळाडू पॉझिटिव्ह 

कोलकाता नाईट रायडर्सचे आणखी दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह 

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. काही खेळाडू, सपोर्ट स्टाफ सदस्य आणि ग्राऊंड स्टाफपैकी काहींना कोरोनाची बाधा झाल्यानंतर बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलला ही स्पर्धा स्थगित करणे भाग पडले होते. परंतु, ही स्पर्धा स्थगित झाल्यानंतरही खेळाडूंना कोरोनाची बाधा होणे थांबलेले नाही. भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा आणि न्यूझीलंडचा यष्टीरक्षक टीम सायफर्टचा कोरोना रिपोर्ट आता पॉझिटिव्ह आला आहे. हे दोघेही यंदाच्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळत होते. त्यामुळे कोलकाता संघाच्या कोरोनाबाधित खेळाडूंचा आकडा चारवर पोहोचला आहे. प्रसिध आणि सायफर्टच्या आधी फिरकीपटू वरूण चक्रवर्ती आणि वेगवान गोलंदाज संदीप वॉरियर यांना कोरोनाची बाधा झाली होती.

प्रसिध घरीच क्वारंटाईन

प्रसिधचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तो आता बंगळुरू येथे त्याच्या घरीच क्वारंटाईन झाला आहे, असे बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, सर्वात आधी वरूण चक्रवर्तीला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर सराव सत्रात संदीप वॉरियर आणि प्रसिध त्याच्या संपर्कात आले. त्यामुळे त्यांनाही कोरोनाची बाधा झाली. प्रसिध आणि चक्रवर्ती हे जवळचे मित्र आहेत.

टीम सायफर्टलाही कोरोना

आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यावर सर्व भारतीय खेळाडूंप्रमाणे प्रसिध ३ मे रोजी आपल्या घरी परतला. त्याआधी त्याचा दोनदा कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र, बंगळुरूला पोहोचल्यावर त्याची पुन्हा चाचणी झाली असता त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले, असेही सूत्रांनी सांगितले. तसेच न्यूझीलंडचा यष्टीरक्षक टीम सायफर्टलाही कोरोनाची बाधा झाली असून तो अहमदाबाद येथे हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहे.

First Published on: May 8, 2021 4:47 PM
Exit mobile version