IPL 2021 : ह्याला म्हणतात खरा कर्णधार! धोनीच्या निर्णयाचे चाहत्यांकडून कौतुक

IPL 2021 : ह्याला म्हणतात खरा कर्णधार! धोनीच्या निर्णयाचे चाहत्यांकडून कौतुक

कर्णधार महेंद्रसिंग धोनीने घेतला महत्वाचा निर्णय

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्व खेळाडू आपापल्या घरी परतत आहेत. परंतु, भारताचा कोरोनाची चिंताजनक परिस्थिती असल्याने बऱ्याच देशांनी हवाई वाहतूक स्थगित केली आहे. भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या परदेशी खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनीने महत्वाचा निर्णय घेतला आहे. चेन्नईचा संघ राहत असलेल्या हॉटेलमधून जोपर्यंत सर्व खेळाडू निघत नाहीत, तोपर्यंत धोनी हॉटेलमध्येच थांबून राहणार आहे. तुम्ही तुमच्या घरी सुखरूप पोहोचल्यानंतर मी रांचीला परतणार असल्याचे धोनीने त्याच्या संघातील सहकाऱ्यांना सांगितले आहे.

धोनीने केली सर्वांशी चर्चा

धोनीने चेन्नईच्या सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. आयपीएल स्पर्धा भारतात होत असल्याने भारतीय खेळाडूंना आपापल्या घरी परतण्यासाठी फार अडचण येणार नाही. त्यामुळे परदेशी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांना प्राधान्य देऊन त्यांना त्यांच्या मायदेशी पाठवण्याची सोय केली पाहिजे असे धोनी म्हणाला.

परदेशी खेळाडूंना प्राधान्य  

माही भाईने (धोनी) आम्हाला सांगितले की, तो सर्वात शेवटी हॉटेलमधून निघणार आहे. सर्वात आधी परदेशी खेळाडूंना त्यांच्या घरी पाठवण्यात यावे आणि त्यानंतर भारतीय खेळाडूंना घरी पाठवण्याची सोय करावी असे तो म्हणाला. चेन्नईचे सर्व खेळाडू आपल्याला घरी सुरक्षित पोहोचल्यावर तो उद्या त्याच्या घरी जाणार आहे, असे चेन्नई संघाच्या सदस्याने सांगितले. धोनीने घेतलेल्या या निर्णयाचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

First Published on: May 6, 2021 4:26 PM
Exit mobile version