IPL 2021 : पृथ्वी शॉ मॅचविनर, त्याच्यावर विश्वास दाखवणे गरजेचे – पंत

IPL 2021 : पृथ्वी शॉ मॅचविनर, त्याच्यावर विश्वास दाखवणे गरजेचे – पंत

रिषभ पंत आणि पृथ्वी शॉ

भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ फार प्रतिभावान खेळाडू मानला जातो. मात्र, त्याला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश येते. त्यातच तो बरेचदा चुकीचे फटके मारून बाद होत असल्याने त्याच्यावर टीकाही होतो. यंदाच्या आयपीएलमध्ये पृथ्वी चांगली कामगिरी करत आहे. गुरुवारी झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात त्याने अप्रतिम फलंदाजी केली. त्याने अवघ्या ४१ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८२ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सने हा सामना २१ चेंडूत शिल्लक असतानाच जिंकला. त्यामुळे सामन्यानंतर दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने त्याचे कौतुक केले.

नैसर्गिक खेळ करण्याचा सल्ला

पृथ्वीमध्ये किती प्रतिभा आहे, हे सर्वांनाच माहित आहे. मात्र, संघाने त्याच्यावर विश्वास दाखवणे गरजेचे आहे. तसे झाल्यास तो मॅचविनर ठरू शकतो. कर्णधार म्हणून मी त्याला केवळ त्याचा नैसर्गिक खेळ करण्याचा सल्ला देतो. आम्ही आमच्या युवा खेळाडूंना खेळाचा आनंद घेण्यास सांगतो. तुम्ही खेळाचा आनंद घेतलात, तर तुम्हाला आपोआपच यश मिळते, असे पंत म्हणाला.

यंदा सातत्यपूर्ण कामगिरी

पृथ्वीला यावर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर मी निराश होणार नाही याची माझ्या वडिलांनी काळजी घेतल्याचे पृथ्वी कोलकाताविरुद्धच्या सामन्यानंतर म्हणाला. तसेच त्यांनी मला नैसर्गिक खेळ करत राहण्याचा सल्ला दिला. वडिलांच्या पाठिंब्यामुळे मी माझ्या खेळावर अधिक मेहनत घेतल्याचेही पृथ्वीने सांगितले. पृथ्वीने यंदाच्या आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याला आतापर्यंत ७ सामन्यांत २६९ धावा करण्यात यश आले असून या धावा त्याने १६५ च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत.

First Published on: April 30, 2021 7:47 PM
Exit mobile version