IPL 2021 : उर्वरित सामने युएईमध्ये; सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये खेळवली जाणार स्पर्धा

IPL 2021 : उर्वरित सामने युएईमध्ये; सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये खेळवली जाणार स्पर्धा

आयपीएलचे उर्वरित सामने युएईत खेळवण्याचा बीसीसीआयचा निर्णय 

कोरोनाचा बायो-बबलमध्ये शिरकाव झाल्याने इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. परंतु, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) शनिवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत (SGM) महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएलचे उर्वरित सामने याचवर्षी युएईमध्ये खेळवले जाणार आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल, अशी बीसीसीआयने घोषणा केली. यंदाचा मोसम स्थगित होण्यापूर्वी ६० पैकी २९ सामनेच होऊ शकले. आता उर्वरित ३१ सामने युएईमध्ये खेळवले जातील.

स्पर्धा खेळण्यावर एकमत 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतामध्ये गंभीर परिस्थिती आहे. त्यातच मान्सूनही असल्या कारणाने आयपीएलचे उर्वरित सामने भारतामध्ये घेणे शक्य नाही. त्यामुळे बीसीसीआयने या सामन्यांसाठी युएईला पसंती दिली आहे. आयपीएलचा मागील मोसम युएईमध्ये यशस्वीरीत्या पार पडला होता. त्यामुळे शनिवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत उर्वरित मोसम याचवर्षी खेळवण्यावर आणि सामने युएईमध्ये घेण्यावर एकमत झाले.

टी-२० वर्ल्डकपबाबतही चर्चा

तसेच भारतामध्ये यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-२० वर्ल्डकपसुद्धा होणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाबाबतही विशेष सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. या स्पर्धेच्या आयोजनाबाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी आयसीसीकडून आणखी थोडा वेळ मागून घ्यावा अशी बीसीसीआयच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली आहे.

 

First Published on: May 29, 2021 2:42 PM
Exit mobile version