IPL 2022: दोन नव्या संघांसाठी १७ ऑक्टोबरला लिलाव?

IPL 2022: दोन नव्या संघांसाठी १७ ऑक्टोबरला लिलाव?

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या (IPL 2022) मोसमात दोन नव्या संघांचा समावेश होणार आहे. यासाठी १७ ऑक्टोबरला दोन संघांसाठी लिलाव होणार असल्याची शक्यता आहे. आयपीएलच्या १४ व्या मोसमाचा अंतिम सामना झाल्यानंतर दोनच दिवसात लिलाव होणार आहे. तसंच, बीसीसीआय हे दोन नवे संघ कोणते असणार आहेत याची देखील घोषणा करणार आहे. बीसीसीआयने दोन संघांसाठी अर्ज मागितले होते. दरम्यान, आता हे दोन नवे संघ कोणते असतील याची उत्सुकता लागली आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार २१ सप्टेंबरला नवीन संघांसाठी आलेल्या अर्जांची छाननी केली जाईल. ५ ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रे सादर केले जातील आणि १७ ऑक्टोबरला लिलाव होईल. दोन नवीन संघांच्या समावेशानंतर प्रत्येक संघाच्या वाट्याला १४ किंवा १८ सामने येतील. पण, आयपीएलसाठीचा कालावधी लक्षात घेता दहा संघांची दोन गटात विभागणी करून सामने खेळवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. नव्या संघांसाठी बीसीसीआयनं ज्या कंपनीचा टर्नओव्हर ३००० हजार कोटी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयने एका संघाची मुळ किंमत २ हजार कोटी रुपये ठेवली आहे, त्यामुळे दोन संघांकडून त्यांना ५ हजार कोटी रुपये मिळू शकतात. आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत नव्या टीमच्या बोली प्रक्रियेबाबत अंतिम चर्चा झाली होती. दोन नव्या संघाची मुळ किंमत प्रत्येकी १७०० कोटी रुपये ठेवण्याचा विचार केला गेला होता, पण आता ही किंमत २ हजार कोटी रुपये ठेवण्याचं निश्चित केलं गेलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दोन नव्या संघांसाठी गुवाहाटी, रांची, कटक, अहमदाबाद, लखनौ आणि धर्मशाला या शहरांच्या नावांची चर्चा आहे. दोन नवीन संघांच्या समावेशामुळे पुन्हा खेळाडूंचा लिलाव होईल आणि सूत्रांच्या माहितीनुसार आता खेळत असलेल्या ८ फ्रँचायझींना प्रत्येकी दोन खेळाडू कायम राखता येतील, तर दोन खेळाडू RTM नुसार संघात राखता येतील. नोव्हेंबरमध्ये याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल आणि जानेवारी २०२२ मध्ये खेळाडुंचा लिलाव होईल.

 

First Published on: September 14, 2021 4:24 PM
Exit mobile version