IPL 2022 मध्ये दोन नवीन संघ, BCCI ने काढलं टेंडर, कोण होणार मालक?

IPL 2022 मध्ये दोन नवीन संघ, BCCI ने काढलं टेंडर, कोण होणार मालक?

क्रिकेट विश्वातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत असलेल्या आयपीएलमध्ये अतिरिक्त दोन नव्या संघाचा समावेश होणार आहे. यासाठी बीसीसीआयने टेंडर जारी केलं आहे. निविदा खरेदी करण्याची अंतिम तारीख ५ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. या दोन नव्या संघांच्या समावेशानंतर बीसीसीआयची तब्बल ५ हजार कोटी रुपयांची घसघशीत कमाई होणार आहे.

आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलने निविदा प्रक्रियेद्वारे बोली आमंत्रित केल्या आहेत. १० लाख रुपये देऊन कोणतीही कंपनी लिलाव संबंधित दस्तावेज खरेदी करु शकते. यात काही नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत. पात्रता सिद्ध करणे, बोली सादर करण्याची प्रक्रिया, प्रस्तावित नवीन संघांचे अधिकार आणि दायित्वे इत्यादी घटक ‘निविदा आमंत्रण’मध्ये समाविष्ट आहे, जे नॉन-रिफंडेबल शुल्काची भरपाई मिळाल्यावर उपलब्ध केले जातील.

तसंच, केवळ व्यक्ती किंवा ग्रुप निविदा खरेदी केल्यानंतर आयपीएल संघासाठी बोली लावण्यास पात्र होणार नाही. त्याला उर्वरित अटी आणि मापदंडांचे पालन करावे लागेल. कोणतेही कारण न देता कोणत्याही टप्प्यावर बोली प्रक्रिया रद्द करण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा अधिकार बीसीसीआयकडे असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयने एका संघाची मुळ किंमत २ हजार कोटी रुपये ठेवली आहे, त्यामुळे दोन संघांकडून त्यांना ५ हजार कोटी रुपये मिळू शकतात. आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत नव्या टीमच्या बोली प्रक्रियेबाबत अंतिम चर्चा झाली होती. दोन नव्या संघाची मुळ किंमत प्रत्येकी १७०० कोटी रुपये ठेवण्याचा विचार केला गेला होता, पण आता ही किंमत २ हजार कोटी रुपये ठेवण्याचं निश्चित केलं गेलं आहे.

दरम्यान, पुढच्या मोसमात ६० ऐवजी ७४ मॅच खेळवल्या जातील. सध्याच्या मोसमातल्या उरलेल्या ३१ मॅच १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणार आहेत.

कोण कोण आहेत शर्यतीत?

नवीन संघांसाठी अहमदाबाद, लखनऊ आणि पुणे या शहरांची नावे समोर आली आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि लखनऊमधील एकाना स्टेडियम ही फ्रेंचायझींची निवड असू शकते, कारण या स्टेडियमची क्षमता अधिक आहे. अनेक व्यावसायिक कंपन्या फ्रेंचायझी खरेदी करण्याच्या शर्यतीत आहेत. अदानी ग्रुप, आरपीजी संजीव गोएंका, फार्मास्युटिकल कंपनी टोरेंट आणि एक बँक हे सर्व आयपीएलमध्ये त्यांच्या उपस्थितीसाठी प्रयत्न करत आहेत.

First Published on: September 1, 2021 11:28 AM
Exit mobile version