महेंद्रसिंग धोनीची जागा घेणे अशक्यच – रवी शास्त्री 

महेंद्रसिंग धोनीची जागा घेणे अशक्यच – रवी शास्त्री 

रवी शास्त्री आणि महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आणि सर्वोत्तम यष्टीरक्षक-फलंदाज मानला जातो. धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ टी-२० आणि २०११ एकदिवसीय असे दोन वर्ल्डकप जिंकले. तसेच तो कर्णधार असताना भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धाही जिंकली. आयसीसीच्या या तीन जागतिक स्पर्धा जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे. धोनीने काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. मात्र, तो मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय वर्ल्डकपनंतर भारताकडून खेळला नव्हता. त्याच्या जागी भारताने रिषभ पंतला संधी दिली, पण पंतला या संधीचे सोने करता आले नाही. त्यामुळे पंतने संघातील स्थान गमावले आणि लोकेश राहुलने यष्टिरक्षणाची धुरा सांभाळली. मात्र, राहुलकडून फार अपेक्षा ठेवणे योग्य नसून धोनीची जागा इतर एखाद्या खेळाडूने घेणे अशक्यच असल्याचे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना वाटते.

असे खेळाडू पुन्हा-पुन्हा घडत नाहीत

धोनी हा महान खेळाडू आहे. धोनीच्या कामगिरीवर नजर टाकल्यास क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये त्याची गणना होईल यात शंका नाही. यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून त्याने उत्कृष्ट कामगिरी होती. तसेच कर्णधार म्हणूनही त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. आपल्याला अजूनही कपिल देव यांची जागा घेऊ शकेल असा अष्टपैलू मिळालेला नाही. आपल्याला आणखी एक सचिन तेंडुलकर मिळेल का? नाही. असे खेळाडू पुन्हा-पुन्हा घडत नाहीत. त्यामुळे धोनीची जागा इतर कोणीही घेणे अशक्यच आहे. मात्र, भारतामध्ये प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाही. या युवा, प्रतिभावान खेळाडूंना संधी मिळाल्यास त्यांनी या संधीचा योग्य उपयोग केला पाहिजे, असे शास्त्री म्हणाले.

First Published on: November 2, 2020 9:09 PM
Exit mobile version