जपानची थँक्यू नोट; पुन्हा ठेवला जगासमोर आदर्श!

जपानची थँक्यू नोट; पुन्हा ठेवला जगासमोर आदर्श!

जपान संघ

जपान हा देश आपल्या नम्रपणासाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी जगासमोर अनेकदा आपल्या नम्रपणाची उदाहरणे ठेवली आहेत. विश्वचषकातून बाहेर पडताना असेच एक उदाहरण जपानने पुन्हा एकदा जगासमोर ठेवले. आपली ड्रेसिंग रूम स्वतः साफ करून तिथे धन्यवाद लिहिलेली नोट सोडली आहे. त्यांच्या या कृतीमुळे त्यांनी सर्वांचीच मने जिंकली. विश्वचषकात बाद फेरीपर्यंत पोहोचल्यानंतर बेल्जियमकडून झालेल्या पराभवामुळे जपानला स्पर्धेबाहेर जावे लागले. मात्र जाता-जाता देखील त्यांनी आपल्या नम्रपणामुळे एक उत्तम उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे.


रशियात सुरू असलेल्या फुटबॉलच्या विश्वचषकात जपान हा एकमेव आशियाई संघ बाद फेरीपर्यंत पोहोचला होता. सगळ्या मॅचेसमध्ये अप्रतिम खेळ दाखवत जपानने बाद फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र बेल्जियमसारख्या बलाढ्य संघांसमोर त्यांना हार मानावी लागली ३-२ अशा फरकाने त्यांचा पराभव झाला असला तरीदेखील संपूर्ण मॅचमध्ये त्यांनी अप्रतिम खेळ दाखवला. आपल्या या ऑनफिल्ड गेमसोबतच त्यांनी ऑफफिल्ड दाखवलेल्या खिलाडू वृत्तीमुळे सर्व जगाला पुन्हा एकदा नम्रपणा काय असतो याची ओळख करून दिली.

असा झाला जपानविरूद्ध बेल्जियम सामना

सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी बचावात्मक पवित्रा घेतला. त्यामुळे ४५ मिनिटानंतरही सामन्यात ०-० असाच स्कोर होता. मात्र सामन्याच्या उत्तरार्धात जपानने आक्रमक खेळ दाखवत केवळ तीन मिनिटाच्या अंतरात २ गोल केले. सर्वात आधी ४८ व्या मिनिटाला जेनकी हारागुचीने गोल करत जपानला सामन्यात १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेचच ५१ व्या मिनिटाला ताकाशी इनुईने जपानसाठी दुसरा गोल करत संघांला भक्कम आघाडी मिळवून दिली. जपानच्या या लागोपाठ केल्या गेलेल्या दोन गोलमुळे जपानी प्रेक्षक कमालीचे उत्साहीत झाले होते. जपानने घेतलेल्या या आघाडीनंतर बेल्जियमने देखील आक्रमक खेळ सुरू करत केवळ ५ मिनिटाच्या अंतरात दोन गोल करत सामन्यात बरोबरी साधली. ६९ व्या मिनिटाला जॅन व्हेरटोनघेनने पहिला गोल तर ७४ व्या मिनिटाला फेलाइनीने दुसरा गोल केला. त्यानंतर दोन्ही संघ विजयी गोल करण्याकरीता धडपड करताना दिसले. मात्र सामन्याची ९० मिनिटे पूर्ण झाली तरी दोन्ही संघांनाही एकही गोल करता आला नाही. त्यामुळे ४ मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आणि ९४ व्या मिनिटाला बेल्जियमचा चाडलीने गोल करत संघांला विजय मिळवून दिला.

जपानविरूद्ध बेल्जियम सामन्यातील एक क्षण

ऑनफिल्डही जपानने दाखवला होता नम्रपणा

गटनिहाय सामन्यात जपान आणि सेनेगल या दोन्ही संघाचे गुण आणि गोल फरकाची संख्या समान होती. मात्र जपान आपल्या फेअर प्लेच्या गुणांमुळे बाद फेरीत दाखल झाले होते. त्यांनी आपल्या सर्व सामन्यात सर्वात कमी ‘यलो कार्ड’ मिळाल्यामुळे त्यांना फेअर प्लेचे गुण दिले गेले होते.

वाचा- जपानला लागली ‘फेअर प्ले’ची लॉटरी; सरस गुणसंख्येवर बाद फेरीत प्रवेश!

First Published on: July 3, 2018 6:43 PM
Exit mobile version