मी अयशस्वी व्हावे अशी अनेकांची इच्छा, अनेकांना माझे यश रुचले नाही : रवी शास्त्री

मी अयशस्वी व्हावे अशी अनेकांची इच्छा, अनेकांना माझे यश रुचले नाही : रवी शास्त्री

भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. अशातच आता रवी शास्त्री यांनी एक परखड मत मांडलं आहे. ‘भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून मी अयशस्वी व्हावे अशी अनेकांची इच्छा होती’, असं रवी शास्त्री यांनी म्हटले.

इंग्लंडमधील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी याबाबत माहिती दिली. रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अग्रस्थानी होता. तसेच भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या पर्वाची अंतिम फेरी गाठली. वन-डे आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्येही भारतीय संघाने मोलाची कामगिरी केली आहे. मात्र अनेकांना हे यश रुचले नसल्याचे रवी शास्त्रींनी या मुलाखतीत म्हटले.

“भारतामध्ये तुम्ही एखाद्या क्षेत्रात अयशस्वी व्हावे अशी अनेकांची इच्छा असते. मी राष्ट्रीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेतलेले नाही. त्यामुळे मी यशस्वी झालो हे अनेकांना रुचले नाही. मात्र, मी इतरांच्या मतांकडे दुर्लक्ष करण्यास शिकलो. त्यांना महत्त्व देणे मी थांबवले. भारतीय संघ परदेशात यशस्वी ठरावा, हे प्रशिक्षक म्हणून माझे मुख्य लक्ष्य होते”, असे रवी शास्त्री यांनी म्हटले.

“सर्व खेळाडूंनी एकत्रित येऊन सांघिक कामगिरी करणे गरजेचे असून कोणत्याही खेळाडूला वेगळी, खास वागणूक मिळणार नसल्याचे मी प्रशिक्षकपद स्वीकारल्यावर स्पष्ट केले होते. खेळाडूंना तंदुरुस्तीवर विशेष लक्ष देण्याची मी सूचना केली. तसेच खेळाडूंना आक्रमक शैलीत आणि निर्भीडपणे खेळण्यास सांगितले. विशेषत: ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी तुम्हाला शिवीगाळ केल्यास तुम्हीही मागे हटू नका, असे मी आमच्या खेळाडूंना बजावले होते. या गोष्टींमुळेच आमच्या संघाने यशस्वी कामगिरी केली”, असेही शास्त्री यांनी नमूद केले.

रवीशास्त्री यांची २०१७ मध्ये भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी हे पद गेल्या वर्षीच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत सांभाळले.


हेही वाचा – IPL 2022: ‘चेन्नई’चा अष्टपैलू मोईन अली दुखापतग्रस्त; आठवडाभर राहावे लागणार मैदानाबाहेर

First Published on: April 27, 2022 11:41 AM
Exit mobile version