कांगारुंची विजयी सुरुवात

कांगारुंची विजयी सुरुवात

Australia v New Zealand

डावखुर्‍या मिचेल स्टार्कच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्या न्यूझीलंडचा २९६ धावांनी धुव्वा उडवला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. तसेच त्यांनी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ४० गुणांची कमाई करत गुणतक्त्यातील दुसरे स्थान अधिक भक्कम केले. वेगवान गोलंदाज स्टार्कने या सामन्याच्या दोन्ही डावांत मिळून ९ गडी बाद करत सामनावीराचा पुरस्कार मिळवला.

ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकण्यासाठी चौथ्या डावात न्यूझीलंडसमोर ४६८ धावांचे आव्हान ठेवले. याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. त्यांच्याकडून केवळ बीजे वॉटलिंग (४०) आणि कॉलिन डी ग्रँडहोम (३३) या दोघांनाच तीस धावांचा टप्पा पार करता आला. त्यामुळे न्यूझीलंडचा डाव १७१ धावांवर आटोपला आणि ऑस्ट्रेलियाने हा सामना २९६ धावांनी जिंकला. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात ५ विकेट्स घेणार्‍या स्टार्कने दुसर्‍या डावात ४५ धावांच्या मोबदल्यात ४ विकेट्स मिळवल्या. त्याला ऑफस्पिनर नेथन लायन आणि पॅट कमिन्सने अनुक्रमे ४ आणि २ गडी बाद करत चांगली साथ दिली.

त्याआधी ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात ४१६ धावा केल्या, ज्याचे उत्तर देताना न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या १६६ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ९ बाद २१७ वर घोषित केला. त्यांच्याकडून जो बर्न्स (५३) आणि मार्नस लबसचेंग (५०) यांनी अर्धशतके झळकावली. न्यूझीलंडच्या टीम साऊथीने ५, तर निल वॅग्नरने २ विकेट्स मिळवल्या.

संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया : ४१६ आणि ९ बाद २१७ डाव घोषित विजयी वि. न्यूझीलंड : १६६ आणि १७१ (वॉटलिंग ४०, डी ग्रँडहोम ३३; स्टार्क ४/४५, लायन ४/६३).

First Published on: December 16, 2019 2:25 AM
Exit mobile version