IPL 2020 : म्हणून केदार जाधवला जाडेजाआधी पाठवले – फ्लेमिंग 

IPL 2020 : म्हणून केदार जाधवला जाडेजाआधी पाठवले – फ्लेमिंग 

केदार जाधव

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या आयपीएल लढतीत चेन्नई सुपर किंग्स संघाचा १० धावांनी पराभव झाला. या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना १६७ धावा केल्या आणि याचा पाठलाग करताना चेन्नईला २० षटकांत १५७ धावाच करता आल्या. या सामन्यात चेन्नईच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. खासकरून महेंद्रसिंग धोनी (१२ चेंडूत ११) आणि केदार जाधव (१२ चेंडूत नाबाद ७) यांना अपेक्षित खेळ करता आला नाही. केदार जाधवला यंदाच्या आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यात अपयश येत आहे. असे असतानाही कोलकाताविरुद्ध त्याला रविंद्र जाडेजा आणि ब्राव्हो यांच्याआधी फलंदाजी पाठवण्यात आले. त्यामुळे त्याच्यावर बरीच टीका झाली. मात्र, केदारला वरच्या क्रमांकावर पाठवण्यामागचे कारण चेन्नईचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी सामन्यानंतर सांगितले.

स्ट्राईक रेट १०० हूनही कमी

केदार फिरकीपटूंविरुद्ध चांगली फलंदाजी करतो. त्यांच्याविरुद्ध तो वेगाने धावा करू शकतो. तो मोठे फटके मारेल असे आम्हाला वाटले आणि म्हणून आम्ही त्याला जाडेजा आणि ब्राव्होच्या आधी पाठवले. जाडेजा अखेरच्या षटकांत येऊन आम्हाला सामना जिंकवून देईल असे वाटले होते. मात्र, तो फलंदाजीला आला, तेव्हा आम्हाला बऱ्याच धावांची गरज होती. त्यामुळे आम्ही पराभूत झालो, असे सामन्यानंतर फ्लेमिंग म्हणाले. जाधवला त्याच्या संथ खेळीमुळे सोशल मीडियावर बरेच ट्रोल केले गेले. केदारला यंदाच्या मोसमात सहा सामन्यांत केवळ ५८ धावा करता आल्या आहेत. त्यातच त्याचा स्ट्राईक रेट १०० हूनही कमी आहे.

First Published on: October 8, 2020 8:05 PM
Exit mobile version