केकेआरची हैद्राबादवर आरामात मात

केकेआरची हैद्राबादवर आरामात मात

रसेलने डाव उलटवला

आंद्रे रसेल आणि नितीश राणा यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या दुसर्‍या सामन्यात सनरायजर्स हैद्राबादवर ६ विकेट राखून मात केली. अखेरच्या ४ षटकांत कोलकताला सामना जिंकण्यासाठी ५९ धावांची गरज होती. रसेल आणि शुभमन गिल यांनी १८ व्या षटकात १९ धावा, १९ व्या षटकात २१ धावा आणि अखेरच्या षटकात १३ धावा काढून कोलकाताला सामना जिंकवून दिला.

या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हैद्राबादने आपल्या २० षटकांत ३ विकेट गमावत १८१ धावा केल्या. एका वर्षाने आयपीएलमध्ये पुनरागमन करणार्‍या डेविड वॉर्नरने ५३ चेंडूंत ८५ धावांची खेळी केली. त्याला जॉनी बेरस्टोव (३९) आणि विजय शंकर (नाबाद ४०) यांनी चांगली साथ दिली. कोलकाताकडून आंद्रे रसेलने २ तर पियुष चावलाने १ विकेट घेतली.

१८२ धावांचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर क्रिस लिन ७ धावा करून माघारी परतला. पण रॉबिन उथप्पा आणि नितीश राणा यांनी ८०धावांची भागीदारी करत कोलकताचा डाव सावरला. पण उथप्पा (३५) आणि दिनेश कार्तिक (२) झटपट बाद झाले. यानंतर राणा (४७ चेंडूत ६८), रसेल (१९ चेंडूत ४९) आणि गिल (१० चेंडूत १८) यांनी कोलकताला विजय मिळवून दिला.

First Published on: March 25, 2019 4:25 AM
Exit mobile version