KKR vs DC : वरुण चक्रवर्तीने घेतली दिल्लीची फिरकी; KKR विजयी 

KKR vs DC : वरुण चक्रवर्तीने घेतली दिल्लीची फिरकी; KKR विजयी 

वरुण चक्रवर्ती

फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा ५९ धावांनी पराभव केला. चक्रवर्तीने दिल्लीच्या गोलंदाजांना चांगलेच अडचणीत टाकत २० धावांत ५ विकेट घेतल्या. कोलकाताने दिलेल्या १९५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला २० षटकांत ९ बाद १३५ धावाच करता आल्या. त्यामुळे कोलकाताने हा सामना जिंकला. कोलकाताचा हा ११ सामन्यांत सहावा विजय होता. त्यामुळे कोलकाताचा संघ सध्या १२ गुणांसह गुणतक्त्यात चौथ्या क्रमांकावर आहे.

या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. कोलकाताच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. त्यांची ३ बाद ४२ अशी अवस्था होती. यानंतर मात्र नितीश राणा आणि सुनील नरीन यांनी कोलकाताचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी रचली. नरीनने ३२ चेंडूत ६४, तर राणाने ५३ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. हे दोघे बाद झाल्यावर अखेरच्या षटकांत कर्णधार इयॉन मॉर्गनने (१७) काही चांगले फटके मारल्याने कोलकाताने २० षटकांत ६ बाद १९४ अशी धावसंख्या उभारली. दिल्लीकडून एन्रिक नॉर्खिया, कागिसो रबाडा आणि मार्कस स्टोइनिस यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

१९५ धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या डावाची खराब सुरुवात झाली. पॅट कमिन्सने दिल्लीचे सलामीवीर अजिंक्य रहाणे (०) आणि शिखर धवन (६) यांना झटपट बाद केले. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर (४७) आणि रिषभ पंत (२७) यांनी दिल्लीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दोघांनाही वरुण चक्रवर्तीने माघारी पाठवले. चक्रवर्तीनेच हेटमायर (१०), मार्कस स्टोइनिस (६) आणि अक्षर पटेल (९) यांनाही बाद करत पाच विकेट पूर्ण केल्या. यानंतर रविचंद्रन अश्विन (नाबाद १४) वगळता दिल्लीच्या फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. त्यामुळे दिल्लीला २० षटकांत ९ बाद १३५ धावाच करता आल्या.

First Published on: October 24, 2020 7:52 PM
Exit mobile version